
मुंबई हे मराठी माणसाचं हृदय आहे. या मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली. मोदी, शहा, फडणवीस भविष्यात ती मुंबई गिळून टाकतील, अशी टीका शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता ओझर येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रातील समस्त मराठी माणूस गट तट विसरून दिल्लीत बसलेल्या गुजरातच्या व्यापाऱ्यांच्या छाताडावर बसला तर ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना ठरेल. लोकसभा, विधानसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित मिळून लढण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे संजय राऊत म्हणाले.
छगन भुजबळ यांना मिळालेल्या मंत्रिपदावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, भुजबळ यांचा कुठलाही पक्ष नाही. अजित पवार यांनी चोरलेल्या पक्षात ते आहेत. भाजपशी सोयरीक केलेला कोणताही नेता हा कालांतराने कितीही मर्द असला तरी त्याचा सरपटणारा प्राणी होणार.
यावेळी शिवसेना उपनेते बबनराव थोरात, सह-संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख शरद चौधरी, तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, दिलीप बामणे उपस्थित होते.