राणेंनी कोणती सेटिंग लावली होती, त्याचे पुरावे सादर करावेत! खासदार संजय राऊत यांचा मुलुंड न्यायालयात जबाब

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी केंद्रीय मंत्री, भाजप नेते नारायण राणे यांच्याविरोधात मुलुंडच्या दंडाधिकारी न्यायालयात जबाब नोंदवला. नारायण राणे यांनी मला खासदार बनवण्यासाठी सेटिंग लावल्याचे विधान केले होते. त्यांनी नेमकी कोणती सेटिंग लावली होती आणि किती खर्च केला, याचे पुरावे सादर करावेत, असे म्हणणे खासदार संजय राऊत यांनी दंडाधिकाऱयांपुढे मांडले. न्यायालयाने त्यांच्या जबाबाची दखल घेतली आणि पुढील सुनावणी 29 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

नारायण राणे यांनी 15 जानेवारी रोजी भांडुप येथील कोकण महोत्सवात खासदार संजय राऊत यांच्याबद्दल बदनामीकारक विधान केले. ‘2004 मध्ये संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांचे नाव मतदार यादीत नव्हते. मी सेटिंग लावून त्यांचा उमेदवारी अर्ज छाननीत मंजूर करून घेतला. तसेच त्यांच्या निवडणुकीसाठी खर्च केला’, असे बदनामीकारक विधान नारायण राणे यांनी केले होते. याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी अॅड. सार्थक शेट्टी यांच्यामार्फत राणेंविरोधात मुलुंड दंडाधिकारी न्यायालयात भादंवि कलम 499, 500 अन्वये फौजदारी तक्रार केली आहे. त्यावर शुक्रवारी दंडाधिकारी एम. आर. वाशीमकर यांच्यापुढे सुनावणी झाली. यावेळी खासदार संजय राऊत यांनी राणे यांच्या वादग्रस्त विधानाविरोधात जबाब नोंदवला.

 मतदार यादीत माझे नाव आधीपासूनच आहे. त्यामुळे राणे यांनी राज्यसभा निवडणुकीत छाननीमध्ये माझा उमेदवारी अर्ज सेटिंग लावून मंजूर करण्याचा प्रश्नच नव्हता. ही वस्तुस्थिती असतानाही राणे यांनी खोटे आणि बदनामीकारक विधान केले. त्यांनी त्यासंबंधी पुरावे सादर केले पाहिजेत, असे म्हणणे खासदार संजय राऊत यांनी मांडले. न्यायालयाने त्यांच्या जबाबाची दखल घेत आणखी साक्षीदार असतील तर त्यांना पुढील सुनावणीवेळी हजर करण्यास मुभा दिली.