
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी पूरग्रस्त मराठवाड्याचा दौरा केला. उद्धव ठाकरे शेतकऱ्यांच्या बांधावरच नाही तर बांधाच्या पलीकडेही गेले. या दौऱ्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या आणि पीएम केअर फंडातून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करा अशी मागणी केली. याचाच पुनरुच्चार शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांशी बोलताना केला.
संजय राऊत म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी आणि त्यांचे कुटुंबीय हवालदील आहेत. निवारा नसल्याने शेतकरी निर्वासितासारखे राहत आहेत. सरकारी मदत अद्याप त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. पंचनाम्याला अधिकारीही पोहोचलेले नाहीत. घराघरात पाणी आहे. नद्यांचा प्रवाह वळल्याने शेतजमीन राहिलेली नाही. त्यामुळे भविष्यात माझी शेती कुठली आणि तुझा बांध कुठले हे सुद्धा कळणार नाही. शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना कृतज्ञतापूर्वक सांगितले की, आपण केलेल्या कर्जमाफीच्या आधारावर इथपर्यंत आलो आहोत. आता कर्जमाफी केली नाही तर जगणे कठीण होईल.
हेक्टरी 50 हजार रुपये मदत आणि पीएम केअर फंडातून कर्जमुक्ती या दोन मागण्या उद्धव ठाकरे यांनी प्रामुख्याने केल्या आहेत. पण देवेंद्र फडणवीस यांनी लावलेले निकष अत्यंत चुकीचे आहेत. त्यानुसार शेतकऱ्यांना एकरी 3-4 हजार रुपयांच्या वर मदत मिळणार नाही. त्यामुळे हेक्टरी 50 हजार मदत मिळणे गरचेचे आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी पंजाबचे उदाहरण दिले. पंजाबमध्येही पूरस्थिती गंभीर असून केंद्राने मदत केलेली नाही. मात्र मुख्यमंत्री भगवंत मान यांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत जाहीर केली. तसेच ज्यांची घरे वाहून गेली त्यांना सरकार 45 दिवसात घर बांधून देणार आहे. महाराष्ट्रात सुद्धा 50 हजार हेक्टरी मदत मिळावी आणि तात्काळ कर्जमाफी व्हावी, असे राऊत यावेळी म्हणाले.
सरकारकडे सध्या पैसा नाही, तिजोरी रिकामी आहे. ठेकेदारांकडून आलेला पैसा तिजोरीत गेलेला नाही. शक्तीपीठ असेल, समृद्धी असेल किंवा एसआरएचा पैसा असेल… हा सगळा पैसा मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्याकडे गेला. मुख्यमंत्री टोलवा टोलवी करत आहेत. उपमुख्यमंत्री म्हणतात पैशाचे सोंग आणता येणार नाही. पण मोदींनी त्यांच्या कार्यकाळात पीएम केअर फंड नावाचा प्रकार सुरू केला. संकट, आपत्ती येईल अशावेळी या फंडाचा वापर होईल. पण हे पैसे खासगी आहेत की सरकारी हे स्पष्ट झालेले नाही. यात असणारी रक्कम देशाच्या बजेटपेक्षा मोठी असावी असे लोकांचे म्हणणे आहे. यात मुंबई सारख्या शहरातून सव्वा दोन लाख कोटी जमा झाले. त्यामुळे या पैशाचा वापर करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, अशी आमची मागणी आहे. यासाठी फडणवीस यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांना घेऊन पंतप्रधानांची, अर्थमंत्र्यांची भेट घ्यावी, असेही राऊत म्हणाले.
काल मराठवाड्यात फिरताना लोकांच्या डोळ्यात अंगार आणि संताप होता. लोक गावात येऊ देणार नाही म्हणून सरकार बाहेरच्या बाहेर पळून गेले. तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात शिवसैनिकांची मदत पोहोचली, पण ते स्वत: पुण्यात आहेत. गाव पाण्यात आणि तानाजी पुण्यात, अशा घोषणा लोक देत आहेत. मुख्यमंत्री आले तेव्हा एक दिवसांसाठी ते मतदारसंघात आले. अख्खा मतदारसंघ पाण्यात असताना हे साहेब पुण्यात होते, अशी टीका राऊत यांनी केली. बहुतेक 11 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना मराठवाड्यात प्रचंड मोर्चा काढेल आणि याचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतील, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.