निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा ‘मनसुख पॅटर्न’ आणि ‘चंदीगड पॅटर्न’, संजय राऊत यांची टीका

इंडिया आघाडीची लिटमस चाचणी म्हणून समजल्या जाणाऱ्या चंदिगड महापौरपदाच्या निवडणुकीत, निवडणूक अधिकाऱ्यांनी इंडिया आघाडीची तब्बल 8 मते जाणीवपूर्वक अवैध ठरवल्याचा आरोप ‘आप’ आणि काँग्रेसने केला असून त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार विजयी झाला. दुसरीकडे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचे उत्पादन आणि वितरण करणाऱ्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीवर चार भाजप नेत्यांची संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या दोन घटनांवर बोट ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजप याच मनसुख पॅटर्न आणि चंदीगड पॅटर्नच्या वापर करेल अशी लोकांच्या मनात शंका असल्याचे राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत तसतशी ईव्हीएम मशिन ठिकठिकाणी सापडायला लागल्या आहेत. उत्तर प्रदेशातील चंदौली येथे भाजप पदाधिकाऱ्याच्या दुकानात तर आसाममध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या मालकीच्या असलेल्या ट्रकमध्ये ईव्हीएम मशिन सापडल्या आहेत. या घटना घडत असताना ईव्हीएम बनवण्याऱ्या सरकारी कंपनीच्या संचालकपदी भाजपचे 4 पदाधिकारी नेमण्यात आले, त्यातील बहुसंख्य हे गुजरातचे आहेत, ही बाब राऊत यांनी निदर्शनास आणून दिली. ईव्हीएमसह त्यामध्ये असणारी गुप्त चिप ज्या कंपनीत बनवली जाते, त्या कंपनीच्या संचालकांमध्ये गुजरामधील भाजपचे पदाधिकारी मनसुख खाचरिया यांचाही समावेश असल्याने पुढली निवडणूक ही मनसुख पॅटर्न आणि चंदीगड पॅटर्नच्या मदतीने लढली जाईल का? अशी लोकांच्या मनात शंका असल्याचे राऊत यांनी म्हटले.

चंदीगडमधील महापौरपदासाठीच्या निवडणुकीबाबत बोलताना राऊत यांनी म्हटले की, “भाजप सरळ मार्गाने कोणतीही निवडणूक जिंकू शकणार नाही, ईव्हीएम हटी भाजप गई, ईव्हीएम है तो मोदी है. काल 2 गोष्टी घडल्या ज्या लोकशाहीला कलंकित करणाऱ्या आहेत. चंदीगड महापौर पदाच्या निवडणुकीत आप आणि काँग्रेसचे बहुमत असतानाही पीठासीन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसवलेल्या व्यक्तीने 8 मते बाद केली. राहुल नार्वेकरांनी ज्या पद्धतीने आमचे आमदार अपात्र ठरवले त्याच पॅटर्नचा वापर करून ही मते बाद ठरवण्यात आली. विजयी होत असलेल्या आप-काँग्रेसच्या युतीच्या महापौराला पराभूत दाखवून भाजपच्या उमेदवाराला विजयी केलं. हा चंदीगड पॅटर्न भाजपने लोकशाहीत आणला आहे. आम्ही आतापर्यंत सीतेचे अपहरण रावणाने केले असे ऐकून होतं, मात्र चंदीगडमध्ये लोकशाहीरुपी सीतेचे अपहरण तथाकथित रामभक्तांनीच केले. हाच चंदीगड पॅटर्न 2024 च्या निवडणुकीच्या निकालानंतरही वापरणार आहेत. “