
चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटांमध्ये घमासान सुरू होते. दोन्ही गटाच्या नेत्यांशी आमचे लोक वारंवार चर्चा करत होते. पण शेवटच्या मिनिटांपर्यंत काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये एकमत झाले नाही. त्यांच्यात एकवाक्यता नव्हती आणि शेवटपर्यंत भानगडी सुरू होत्या. त्यामुळे जे पक्ष तुम्हाला पाठिंबा देणार होते त्यांना तटस्थ राहावे लागले किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत बुधवारी दिल्लीत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
संजय राऊत म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठेही भाजपबरोबर हातमिळवणी केली नाही. किंबहुना अंबरनाथला काँग्रेसचे नगरसेवक भाजपबरोबर गेले. त्यानंतर काँग्रेसने त्या नगरसेवकांवर कारवाई केली तेव्हा आम्ही त्यांचे अभिनंदनही केले. पण चंद्रपूरमध्ये काँग्रेसच्या दोन गटातच घमासान सुरू होते. दोन्ही गटाच्या नेत्यांशी आमचे लोक वारंवार चर्चा करत होते. पण शेवटच्या मिनिटांपर्यंत काँग्रेसच्या दोन गटांमध्ये एकमत झाले नाही. त्यातून पुढे सगळ्या गोष्टी घडत गेल्या.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरच्या लोकांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या की, आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला मदत करायची नाही. आपण एका वेगळ्या भूमिकेत आहोत. विरोधी पक्षात बसायला लागले तरी हरकत नाही. उलट उत्तम प्रकारे आपल्याला काम करता येईल. तरीही काँग्रेसच्या घोळामुळे स्थानिक लोकांनी हा निर्णय घेतला, याचा अर्थ आम्ही भाजपबरोबर गेलो असे मी मानायला तयार नाही. मुंबईत गेल्यावर याच्यावर आम्ही चर्चा करू. सत्तेसाठी वाटेत ते करायला कुणी जात असेल तर शिवसेना पक्षप्रमुख ते सहन करणार नाही. उद्धव ठाकरे यांना भेटून चर्चा करू आणि त्यानंतर पक्षप्रमुख निर्णय घेतील, असेही राऊत म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, विरोधी पक्षात बसावे लागले तरी चालेल अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची चंद्रपूरबाबत होती. पक्षप्रमुखांची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि परखड होती. पण त्या भागामध्ये काँग्रेस पक्षच विस्कळीत झाला. खरे म्हणजे काँग्रेसला लाज वाटली पाहिजे की, सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आलेले असताना ते चंद्रपूरची सत्ता मिळवू शकले नाहीत. याला जबाबदार कोण? याची चौकशी उच्चपातळीवर व्हायला पाहिजे.
चंद्रपूरबाबत शिवसेनेला दोष देऊन अर्थ नाही. तुमच्याकडे सर्वाधिक नगरसेवक होते. वंचित, एमआयएम यांनी सुद्धा तुम्हाला शेवटच्या क्षणी पाठिंबा दिला नाही. कारण तुमच्यामध्ये एकवाक्यता नाही. तुमच्या दोन गटात शेवटपर्यंत भानगडी सुरू राहिल्या. त्याच्यामुळे इतर पक्ष जे तुम्हाला पाठिंबा देणारे होते त्यांना तटस्थ राहावे किंवा वेगळा निर्णय घ्यावा लागला, असेही संजय राऊत म्हणाले. चंद्रपूरच्या एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणी असे प्रसंग निर्माण होतील, पण आम्ही त्याच्यावर एकत्र बसून चर्चा करू, असेही ते म्हणाले.


























































