शिवसेनेचे महाअधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. या महाअधिवेशनानंतर नाशिकच्या ऐतिहासिक हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या अतिविराट सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे तडाखेबंद भाषण झाले. या भाषणावर टीका करणाऱ्या मिंधे गटाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला. या उंदरांनी बिळातच राहावं योग्यवेळी आम्ही त्यांना बिळातून बाहेर काढू, अशा शब्दात त्यांनी मिंधे गटावर टीका केली.
नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी मिंधे गटावर टीका करताना म्हटले की, ‘ही मांजरे, लांडगे ईडीला घाबरून पळून गेले. ईडीच्या भीतीने भाजपच्या बिळात लपलेल्या उंदरांना अशा प्रकारच्या गर्जना करण्याचा अधिकार नाही, उंदीर गर्जना करत नाहीत. या उंदरांनी बिळातच राहावं योग्यवेळी आम्ही त्यांना बिळातून बाहेर काढू.’
तपास यंत्रणांकडून केल्या जात असलेल्या छळाबाबत बोलत असताना राऊत यांनी म्हटले की रोहित पवार यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. केंद्रीय तपास यंत्रणा या स्वतंत्र तपास यंत्रणा राहिलेल्या नाहीत त्या भाजपच्या शाखा झाल्या आहेत. लोकशाहीच्या रक्षणासाठी हुकूमशाही विरोधात आवाज उठवतील, जे भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये जायला तयार नाही अशा प्रमुख लोकांना, नातेवाईकांना, सहकाऱ्यांना भाजप ईडीच्या माध्यमातून त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. रोहित पवार हे एकटे नसून संपूर्ण महाविकास आघाडी त्यांच्या पाठीशी आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाटेला उपेक्षा का ?
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात यावे ही मागणी शिवसेना सातत्याने करत आली आहे. आमची ही भूमिका आजची नसून एनडीएचे सरकार असल्यापासूनची आहे असे राऊत यांनी म्हटले आहे. चळवळीतील्या प्रमुख लोकांचा सन्मान होतोय मात्र वीर सावरकरांना उपेक्षित का ठेवलं जातंय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. ज्या प्रमाणे भाजप रामाचे राजकारण करत आहे तसेच ते सावरकरांचेही करत आहे अशी टीका राऊत यांनी केली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीपासून भाजप पळ का काढत आहे? हे त्यांनी सांगावे असे आव्हानच राऊत यांनी दिले आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, “2014 पासून आतापर्यंत 11 लोकांना भारतरत्न देण्यात आले, आम्ही प्रत्येकवेळी वाट पाहातो की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्यात येईल, वीर सावरकरांचा उद्घोष राजकीय कारणासाठी भाजपकडून केला जातो, आम्ही त्यातले नाही. मोदीजी नाशिकला होते ते काळाराम मंदिरात गेले मात्र भगूरला गेले नाही, त्यांनी स्वातंत्र्यवीरांचे दर्शन घेतले नाही, आम्ही सगळे जाऊन आलो. वीर सावरकरांना भारतरत्न द्यावं ही आमची भूमिका आजची नाही तर आम्ही एनडीएमध्ये असल्यापासून आहे. कर्पुरी ठाकूरांना भारतरत्न दिल्याचा आम्हाला आनंद आहे, निवडणुका असल्याने बिहारच्या दृष्टीने भाजपसाठी ते महत्त्वाचे आहे, भाजपचे पाऊल हे राजकीय स्वार्थासाठीच पडते, मात्र त्या निमित्ताने चळवळीतील्या प्रमुख लोकांचा सन्मान होतोय. मग वीर सावरकरांना उपेक्षित का ठेवलं जातंय?”