खिचडी घोटाळ्याच्या लाभार्थींची वर्षा बंगल्यावर कॅटरींग सेवा, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

मुंबई महापालिकेतील खिचडी घोटाळ्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आहेत. खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी आज भाजप आणि मिंधे गटात आहेत. या लाभार्थ्यांनी खिचडीचे वाटप न करता त्याचे पैसे लाटले असा आरोप राऊत यांनी केला आहे.

मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, ‘खिचडी घोटाळ्याचे लाभार्थी आज भाजप आणि मिंधे गटात आहेत. त्यातल्या काही लोकांची कॅटरींग सेवा देवगिरी आणि वर्षा बंगल्यावर सुरू आहे. मिंधे गटातील खासदाराची त्यांच्याशी पार्टनरशिप आहे. बिलं काढली पण खिचडी वाटली नाही. अमेय घोले, वैभव थोरात, राहल कनाल यांनी कोट्यवधींचा घोटाळा मुंबई महापालिकेत केला आहे. यांची नावे घेण्याची सोमय्या आणि ईडीची हिम्मत आहे का ? आम्ही वार झेलायला तयार आहोत, पलटवाराची संधी मिळेल आणि जेव्हा आम्ही वार करू तेव्हा तुम्ही उठू शकणार नाही. ‘ आम्ही किंवा आमच्या पक्षातील लोकांना कितीकाळ त्रास द्याल. आमच्यापुढे लढवय्या बाण्याचा आदर्श आहे, तुमच्यासारख्या रणछोडदास नाहीयोत असं म्हणतानाच संजय राऊत यांनी आमचाही बॉस बसला असून तो सागर बंगल्यात बसलेला नाही तर तो ईश्वर आहे असा टोला लगावला.

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीत 400 हून अधिक जागा जिंकू असा दावा केला आहे. यावर बोलताना राऊत यांनी म्हटले की, 400 पार सोडा तुम्ही 200ही पार करण्याची तुमची औकात नाही आणि त्यामुळे तुम्ही बहुमताचा जुगाड करण्याचा प्रयत्न करत आहात. हे होणार नाही तुम्ही हरणार आहात, तुम्हाला रामही वाचवणार नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत बोलताना राऊत यांनी म्हटले की, वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीचा घटकपक्ष म्हणून चर्चेला बोलावले आहे. राजू शेट्टींशीही आमची चर्चा सुरू आहे. ते ज्या भागातून लढतायत ती जागा शिवसेनेची आहे, आम्ही यासंदर्भात चर्चा करू. महाराष्ट्रात जागावाटपामध्ये कोणतीही अडचण नाही.