
कालची शिवतीर्थावरील सभा गेमचेंजर, परिवर्तन करणारी सभा आहे. शिवतीर्थ ओसंडून वाहत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भाषण, त्यांचा विचार हा फक्त शिवतीर्थावर जमलेल्या अलोट गर्दीने ऐकला नाही तर, महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे-जिथे मराठी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचला. भिऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हा संदेश ठाकरेंनी काल महाराष्ट्राला, मराठी माणसाला दिला, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई 50 सभा घेतल्या, शिंदे हेलिकॉप्टर, चार्टर्डने मुंबई, ठाण्यात फिरताहेत. शिवसेना कुठे आहे? ठाकरे कुठे आहेत? असे विचारणाऱ्यांना एवढेच सांगतो की, ठाकरेंना 1760 सभा घ्यायची गरज नाही. एक सोनार की और दो लोहार की. कालची शिवतीर्थावरील सभा गेमचेंजर होती आणि एका सभेने आमचा विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेला. काल दोन्ही नेत्यांनी अक्षरश: तुफान निर्माण केले. राज ठाकरे यांनी अदानी संदर्भात जे प्रेझेंटेशन निर्माण केले, ते आतापर्यंत देशाच्या इतिहासात कुणीच केले नाही. महाराष्ट्र, मुंबई नव्हे तर देश एका उद्योगपतीच्या अंमलाखाली कसा आणला गेला याचे दूध का दूध पानी का पानी झाले. पंतप्रधान मोदी नसून अदानी आहे की काय असा प्रश्न आम्हाला पडला. एकेकाळी ‘सब भूमी गोपाल की’ अशी घोषणा होती, पण आता ‘सब भूमी अदानी की’ सुरू आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
संजय राऊत पुढे म्हणाले की, शिवसेनेने कायम उद्योगपतींना पाठिंबा दिला आहे. कारण उद्योग वाढले तर, नोकऱ्या वाढतील ही बाळासाहेबांची भूमिका होती. मालक जगला, तर कामगार जगेल. भांडवल आले पाहिजे,. आम्ही भांडवलदारांच्या विरोधात कधीच नव्हतो. कारण भांडवल, गुंतवणूक जेवढी एखाद्या राज्यात येईल, तेवढा रोजगार वाढेल, राज्याची आर्थिक स्थिती सुधारेल, राज्याचा विकास होईल. पण भाजपने एका उद्योगपतीसाठी ‘वन विंडो’ सिस्टीम केली आहे. त्याला आम्ही विकास किंवा उद्योग म्हणत नाही, तर त्याला लूट म्हणतो.
एखाद्या उद्योगपतीने मुंबई, महाराष्ट्र, देशात उद्योग-व्यापार करायला काहीच करत नाही. व्यापाराचा विस्तार करायला हरकत नाही. पण ज्या पद्धतीने मोदी आल्यानंतर अदानींचा विस्तार झाला, त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. आमचा संबंध मुंबई, महाराष्ट्राशी आहे. लहान-लहान भूखंडांवर सुद्धा अदानीने खुंट्या ठोकल्या आहेत. घाटकोपरला जिथे सगळ्यात मोठा अपघात झाला, होर्डिंग कोसळला आणि 40 लोक ठार झाले तो भूखंडही अदानीने घेतला. तिथे अदानीच्या इमारती उभ्या राहत आहेत. तुम्ही काय काय गिळताय, गिळायला मर्यादा असतात ना, असेही राऊत यावेळी म्हणाले.
देशात टाटा उद्योग समूह आहे. अजीम प्रेमजी, बिर्ला, नारायण मूर्ती असे अनेक उद्योपगती आहेत, त्यांनी देशाच्या आर्थिक विकासाला गती दिलेली आहे. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उद्योग, व्यवहार, व्यापार होत आहेत. कधी कुणाविषयी आक्षेप आला नाही. अदानीच का? कारण अदानी हा भ्रष्टाचाऱ्यांचा पोशिंदा आहे आणि मुंबई, महाराष्ट्रावर त्यांचा सगळ्यात जास्त डोळा आहे. म्हणून आमची लढाई आहे. अंबानी काय मुंबई गिळायला बसलेले नाही. अंबानी इथे राहतात, जगभरात उद्योग करतात. रिलायन्सने मुंबई, महाराष्ट्रातील हजारो मराठी तरुणांना रोजगार दिला आहे. आमचा संबंध रोजगाराशी आहे, असेही राऊत एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
मुंबई विमानतळाची जागा विकून टाकण्याचा डाव केंद्राचा असल्याचा गौप्यस्फोट राज ठाकरे यांनी शिवतीर्थावरील भाषणादरम्यान केला. त्याचा उल्लेख करताना राऊत म्हणाले की, या शहराला यापुढे विमानतळ नसणार आहे. न्यूयॉर्क, दिल्लीमध्ये विमानतळ नाही ही कल्पना कशी वाटते? या सगळ्यांच्यावर मुंबई शहर आहे. मोजक्या आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये ज्याची गणना होती त्या शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव पुसले जाणार आहे. महाराष्ट्राला कमकुवत करण्यासठी मुंबईचे दळणवळण तोडण्यासाठी हे विमानतळ गरज नसताना नवी मुंबईला शिफ्ट करत आहेत, असे राऊत म्हणाले.

























































