संघाच्या शाखेत यापुढे मुस्लिमांचे स्वागत करणार का? संजय राऊत यांचा मोहन भागवत यांना सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शनिवारी झालेल्या ‘मुंबई व्याख्यानमाला’ या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता सलमान खानने हजेरी लावली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संघावर हल्लाबोल केला. कालच्या संघाच्या कार्यक्रमात सलमानला दिलेलं आमंत्रण हे गर्दी जमवण्यासाठी होतं की यापुढे आता संघात यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का?” असा सवाल त्यांनी केला.

संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी महापौर पदासाठी केलेली मराठी व्यक्तीची निवड आणि संघाच्या कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, काल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यक्रम झाला. मलाही आमंत्रण होतं. त्यावेळी सलमान खान होते व्यासपीठावर असं मला कळलं. गर्दी जमवायला सलमान खानसारख्या बॉलिवूडमधील मोठ्या स्टारचं स्वागत होतं की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुल आमंत्रण आहे? संघात संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्यांच स्वागत आहे का? हे जर मोहन भागवतांनी स्पष्ट केल असतं, तर अधिक योग्य झाल असतं, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, ज्या पद्धतीने हिंदू-मुसलमान असा एक द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही काळापासून केला जातो, त्याच्यामध्ये संघही सामील आहे. मोदी, फडणवीस, अमित शहा व इतर सगळे लोक हिंदू मुसलमानांचं द्वेषपूर्ण राजकारण करतायत त्यात हे सगळे मूळचे संघाचेच लोक आहेत. त्यामुळे सलमान खान वगैरे इतर अनेक कलाकारांना आपण जे आपल्या व्यासपीठावर बोलवंल तुम्हाला एक प्रश्न आहे हे सलमान खान पूरतं मर्यादित होतं का ? कारण तो एक मोठा कलाकार आहे आणि लोकांना दाखवायचं होतं की सलमान खान सुद्धा आमच्या व्यासपीठावरती आला. सध्या सत्ता आहे, उद्या जेव्हा सत्ता जाईल तेव्हा हे सगळे लोक परत आपल्या व्यासपीठावर येतील का? हा एक फार गमतीचा प्रश्न आहे. क्या करेंगे भाई जाना पडता है, अशा काही संघाच्या कार्यक्रमातील चर्चा माझ्या कानावर आल्या. ठीक आहे सलमान खानला बोलावलं याबद्दल स्वागत, पण या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रभक्त राष्ट्रवादी मुसलमान आहेत, त्यांचे स्वागत करा, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच ओरिजनल असं काही नाही

मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी मराठी माणसाची निवड करण्यात आली. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या नगरसेविका रितू तावडे यांची भाजपने निवड केलेली आहे. त्याबद्दल मी त्यांच अभिनंदन करतो. भाजपला यानिमित्ताने कळलं की मुंबईतला मराठी माणूस हा सुद्धा हिंदू आहे आणि या मराठी माणसानेच देशाच्या स्वातंत्र्याचं आणि हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. मराठी माणूस, मराठी अस्मिता ही शिवसेनेने निवडणुकीत प्रचाराची दिशा ठरवली होती, आणि मराठी माणसाने शिवसेनेला, मनसेला एकत्रित जे भरभरून मतदान केलं त्या दबावापोटीच भाजपला मराठी महापौर करावा लागला. रितू तावडे मूळच्या काँग्रेस वाल्याच आहेत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच ओरिजनल असं काही नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सलमान संघ दक्ष