
पावसाळी अधिवेशन सुरू असताना गुरुवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. विधिमंडळाच्या लॉबीत कार्यकर्त्यांनी शिवीगाळ केली, एकमेकांचे शर्ट फाडले. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी परखड शब्दात प्रतिक्रिया दिली. विधान भवनात गँगवॉर सुरू आहे. भाजपने पोसलेले मोक्का, खुनाचे आरोपी विधिमंडळात येत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हे नियंत्रणात नाही. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावा, असे शिवसेनेचे स्पष्ट मत असल्याचे राऊत शुक्रवारी सकाळी माध्यमांशी बोलताना म्हणाले.
विधानभवनातील राड्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे टोळीयुद्ध आहे. गँगवॉर आहे. विधानभवनात घडलेला प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक विधान माझ्या लक्षात आहे की, मी महाराष्ट्राची संस्कृती जपेन, संस्कृती बदलू देणार नाही. पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कारकिर्दीमध्ये रोज अनेक मार्गाने डाग लागतोय. मग तो भ्रष्टाचार असेल किंवा व्याभिचार, हनी ट्रॅप असेल… आमदार निवासमधील टॉवेल गँग असेल…मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन बसलेत पण कारवाई होत नाही. मोक्काचे, खुनाचे आरोपी, दाऊदचे हस्तक त्यांच्या पक्षात घेतले जात आहेत. ही या महाराष्ट्राच्या संस्कृती आहे का? असे मला फडणवीस यांना विचारायचे आहे. ही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाची संस्कृती आहे का? ज्या संस्कारातून ते आलेले आहेत, त्या संस्कारात हे सगळे बसतेय का? राज्यात एवढे सगळे होत असताना मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसले आहेत, असे राऊत म्हणाले.
द्रौपदीचे वस्रहरण सुरू असताना धर्मराज ज्या प्रमाणे खाली मान घालून बसले होते, त्या भूमिकेत फडणवीस आहे. वस्रहरणाला पांडवांचे पाठबळ होते. पांडव कमजोर होते, म्हणून द्रौपदीचे वस्रहरण उघड्या डोळ्याने ते पहात होते. द्रौपदीवर जुगारावर लावणाऱ्यांची जी संस्कृती तेव्हा निर्माण झाली होती, मला वाटते भाजप आणि त्यांचे नेते उघड्या नेत्याने महाराष्ट्राचे वस्रहरण पाहताहेत. त्याला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत, कारण तेच जुगाराच्या अड्ड्यावर बसलेले आहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या विधानसभेत काल गँगवॉर झाले. विधानभवनामध्ये टोळीयुद्ध झाले. खुनाचे, मोक्काचे, दरोड्यातील आरोपी काल विधान भवनाच्या लॉबीत होते. त्यांना कुणी आणले, काय कारवाई झाली? कालची घटना पाहिल्यावर शिवसेनेचे हे स्पष्ट मत झाले की, महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागायला पाहिजे. फडणवीस यांना हे राज्य नियंत्रणात ठेवता येत नाही. हे गुंडांचे राज्य झाले आहे. जर हे इतर कुणाच्या राज्यात झाले असते, कुणी अन्य मुख्यमंत्री असता तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भवनाच्या पायरीवर येऊन किंचाळले असते की, हे सरकार बरखास्त करा, इथे राष्ट्रपती राजवट लावा. मग कालच्या घटनेनंतर त्यांना वाटत नाही का की, माझे राज्य हे आता राष्ट्रपती राजवट लावण्याच्या लायकीचे झाले आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी टीम फडणवीसच्या चौकशीची मागणीही केली.
भाजपच्या आमदाराबरोबर काल जे लोक होते त्यांचा रेकॉर्ड तपासा. त्यातले किती मोक्काचे आरोपी आहेत? मोक्काचे आरोपी, दाऊद इब्राहिमचे हस्तक विधिमंडळाच्या आवारात येऊ लागले आहेत. उद्या ते विधानसभेत जातील आणि अशा प्रकारचे गँगवॉर हे सभागृहात होईल, त्याला भाजप उत्तेजन देईल. भाजपमध्ये गेल्या दोन महिन्यात अंडरवर्ल्डप्रमाणे भरती झाली. रोज पाच-दहा गुंड प्रवेश करून घेताहेत. प्रवेश करण्यासाठी त्यांच्यावरचे गुन्हे काढले जात आहेत. नाशिकमध्ये भाजपात प्रवेश करायचा म्हणून आधीचे गुन्हे ताबडतोब रद्द केले जात आहेत. अशा या ठगांचे नेतृत्व फडणवीस, बावनकुळे, रविंद्र चव्हाण करत आहेत. हे बोलायला गोड आहेत, आतून काळेकुट्ट आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.






























































