‘ओला दुष्काळ’ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस पेशवेकालीन शहाणे! – संजय राऊत

मराठवाड्याला महापुराची मगरमिठी पडलेली आहे. उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. मात्र ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. ‘ओला दुष्काळ’ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही म्हणणारे मुख्यमंत्री पेशवेकालीन शहाणे, ते नाना फडणवीसांप्रमाणे वागताहेत, असे राऊत म्हणाले.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे पेशवे काळातील शहाणे आहेत. त्या काळात पंतप्रधान किंवा शाहू महाना नाना फडणवीस जशी सरकारी भाषा वापरत होते, तसेच फडणवीस वापरत आहेत. फडणवीस यांचे म्हणणे आहे की, ओला दुष्काळ हा शब्द शासनाच्या शब्दकोशात नाही. सुका दुष्काळ आहे. पण नुकसान तेच आहे. शेतकरी हवालदील आहे.

काल आम्ही लातूरला गेलो तेव्हा काँग्रेस आमदार अमित देशमुख आणि माजी आमदार धीरज देशमुख आमच्या बरोबर शेतकऱ्यांच्या बांधावर होते. तेव्हा हा विषय निघाला. अमित देशमुख म्हणाले, ओला दुष्काळ शासकीय शब्द नसेल, पण ओला दुष्काळ जाहीर करा ही लोकभावना आहे. सरकार लोक भावनेवर चालते. शासकीय शब्दांच्या शब्दकोशावर चालत नाही. लोकभावना आहे की ओला दुष्काळ आहे, तो जाहीर करा. शब्दांचा अर्थ सांगत बसू नका. आपण दिल्लीत आहात. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना बोलावून घ्या आणि त्यांच्यासह अर्थमंत्री, पंतप्रधान यांना भेटून किती मदत तात्काळ देता येईल ते बघा. कारण सगळ्यात आधी शेतकऱ्यांना धीर आणि दिलासा देणे गरजेचे आहे.

पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत द्या आणि पीएम केअर फंडातून कर्जमाफी करा! – संजय राऊत

फडणवीस हे मुख्यमंत्री असून त्यांनी महाराष्ट्रातील सगळ्या उद्योगपतींकडून पैसे जमा केले पाहिजे. हे सगळे उद्योगपती भाजपच्या खिशात आहेत. त्यांनी मुंबई क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआयकडून मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी ताबडतोब 2 हजार कोटी घेतले पाहिजे, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.

दरम्यान, धाराशीव जिल्ह्यात पूरपरिस्थिती असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे नाचगाण्यात मग्न असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, सरकार असंवेदनशील असल्यामुळे प्रशासन सुद्धा असंवेदनशील झाले आहे. प्रशासनावर कोणताही धाक नाही. सरकारने जरी आम्हाला तुटपुंजी मदत केली तरी अधिकारी इतके मस्तवाल आहेत की ती मदत आमच्यापर्यंत पोहोचणार नाही, ते आमचा छळ करतील. अनेक निकष लावून मदत आमच्यापर्यंत पोहोचणार नाही याची काळजी घेतील. त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घोटाळा होण्याची शक्यता आहे, असे शेतकऱ्यांची म्हणणे आहे. याआधी एक तहसीलदार खुर्चीवर बसून गाणे म्हणत होता म्हणून त्याला निलंबित करण्यात आला. आता धाराशीवच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? लोक चिखलात तिथे उपाशी आहेत आणि तुम्ही नाचताय, असा समाचार संजय राऊत यांनी घेतला.