
मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळत असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही. जनतेचा आक्रोश सरकार दरबारी पोहोचवण्याचे काम विरोधी पक्ष नेता करत असतो. राज्याला दोन-दोन बिनकामाचे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत पण विरोधी पक्ष नेता नाही, ही लोकशाही साठी लाजिरवाणी गोष्ट आहे, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात या सरकारने विरोधी पक्ष नेता ठेवला नाही. विधानसभेत देत नाही आणि विधान परिषदेत सुद्धा नेमू दिला नाही. अशा संकट समयी जनतेचा आवाज म्हणून सरकारला मार्गदर्शन करण्याचे काम विरोधी पक्षाचा नेता करतो आणि त्यातून सरकारला दिशा मिळते. कारण सरकार बरोबर विरोधी पक्षनेता सुद्धा अशा संकटाच्या जागी फिरत असतो, लोकांची मतं समजून घेतो, दु:ख समजून घेतो आणि त्यानंतर तो आपली भूमिका मांडतो. त्यातून सरकारला दिशा मिळते. पण या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी लोकशाहीविरुद्ध कट केला आहे. तिघांनी महाराष्ट्राच्या जनतेविरुद्ध कारस्थान केलेले आहे.
विरोधी पक्षनेते पद नसणे हा या राज्याच्या जनतेचा आक्रोश दडपण्याचा प्रयत्न आहे. विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी भास्कर जाधव यांची नियुक्ती करावी असे विधिमंडळात तीनही प्रमुख पक्षांनी कळवले आहे. विधान परिषदेमध्ये सुद्धा अंबादास दानवे निवृत्त झाल्यावर काँग्रेसच्या नेतृत्वाने सगळ्यांच्या संमतीने एक नाव कळवलेले आहे, पण त्यांनाही नेमले जात नाही. याचा अर्थ काय समजायचा? असा सवाल राऊत यांनी केला.
मराठवाड्यावर अस्मानी संकट कोसळत असताना विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही;
जनतेचा आक्रोश सरकार दरबारी पोहोचवण्याचे काम विरोधी पक्ष नेता करत असतो
राज्याला दोन दोन बिनकामाचे उपमुख्यमंत्री मिळाले आहेत पण विरोधी पक्ष नेता नाही!
ही लोकशाही साठी लाजिरवाणी गोष्ट आहे pic.twitter.com/M4JlzHUzh3— Sanjay Raut (@rautsanjay61) September 24, 2025
लोकशाहीच्या गप्पा मारता, स्वातंत्र्य, लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संसद, विधानसभा यावर प्रवचण झोडता. पण ज्या राज्यातून घटनातज्ज्ञ बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले तिथे जनतेचा वतीने आवाज उठवणारा विरोधी पक्षनेता ठेवला नाही. तुम्ही जनतेला काय मदत करणार? असेही राऊत म्हणाले. तसेच तीन पक्षांमध्ये आपापसात साठमारी सुरू आहे. अधिकारी सरकार चालवत आहेत. अधिकाऱ्यांनी निदान अशा प्रसंगी माणुसकी दाखवावी. पण अधिकारी काय कारणार, कारण तिजोरीत पैसेच नाहीत. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त डोक्याला हात लावून बसले आहेत.
मिंध्यासारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन आपल्या दाढीचे, चेहऱ्याचे फोटो टाकून मदत देत आहेत. सरकारची मदत आहे, मग महाराष्ट्र सरकार म्हणा. तुमच्याकडे किंवा फडणवीस यांच्याकडे इतका प्रचंड पैसा वाहत चालला आहे का पुरासारखा? ज्यामुळे तुम्ही तुमचे फोटो टाकून मदत देताहेत. माणसं मरताहेत, गुरं-ढोरं वाहून चालली आहेत आणि इथे सुद्धा अमानुष राजकारण करताहेत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.