
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना भाजप व तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावर सडकून टीका केली. ”महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काळजी करण्याचं काम केसीआर यांनी करू नये. त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत, त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं”, असे संजय राऊत यांनी के चंद्रशेखर राव यांना सुनावले आहे.
”निवडणूकीच्या तोंडावर बऱ्याच गोष्टी होत असतात. आज सामनात आम्ही बऱ्याच गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे हीत पाहण्यासाठी तुम्हाला इथे यायची गरज नाही. तुमचा पक्ष राष्ट्रीय स्तरावर काम करत नाही, तुम्हाला राष्ट्रीय धोरण नाही. तुमचा पक्ष शेजारच्या आंध्र प्रदेशमध्येही नाही आणि तुम्ही महाराष्ट्रात घुसताय. भाजपने तुम्हाला सुपारी दिली आहे महाविकास आघाडीला त्रास देण्याची. लोकसभा व विधानसभेत मतविभागणी करण्यासाठी केसीआर यांचं प्रयोजन करण्यात आलं आहे. 2019 ला एमआयएला आणलं होतं तसं आता केसीआर आले आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा देखील समाचार घेतला. ”बावनकुळे कधीपासून केसीआर यांची वकिली करायला लागले. तुम्ही तुमच्या पक्षाकडे बघा. तसं चंद्रशेखऱ बावनकुळे यांना फार महत्त्व द्यायची गरज नाही. बावनकुळे स्वत: भाजपचे सी टीम आहेत, यांच्या हातात काही नाही. सर्व काही दिल्लीत ठरवलं जातं. इथे ना फडणवीसांच्या हातात काही आहे ना बावनकुळेंच्या, सर्व काही दिल्लीच्या आदेशाने इथली भाजप चालते. मी फक्त एवढंच म्हटलं होतं की भाजपने एवढ्या बी सी टीम बनवल्या आहेत. 2019 ला भाजपने एमआयएला बी टीम बनवलं, कधी मनसेला बनवलं, आता ते केसीआर आले आहेत. काम झालं की नंतर विसरतात. पण मविआ सर्व प्रकारच्या लढाईसाठी समर्थ आहेत. आम्ही जिंकू. ”, अशा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
बी टीम वापरण्याचा स्वतंत्र कक्ष
”भाजपचा बी टीम वापरण्याचा एक स्वतंत्र कक्ष आहे. कधी ते एमआयएमला वापरतात, कधी एमएनएसला आणतात. कधी केसीआरला बोलवतात. हे त्यांचं धोरण आहे. पण 2024 ला तुम्ही कितीही प्रयोग केले तरी मविआ मजबूतीने लढा देणार. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची काळजी करण्याचं काम केसीआर यांनी करू नये. त्यांच्या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू आहेत. त्यांच्या राज्यात आतापर्यंत 65 सरपंचांनी आत्महत्या केल्या आहेत कारण ग्रामपंचायतीची बिलं मिळत नाहीए. त्यांच्या मुलीची ईडीकडून चौकशी सुरू आहे. या सगळ्याचा परिणामच आहे की ते भाजपला मदत करण्यासाठी महाराष्ट्रात घुसले आहेत.’, असे संजय राऊत म्हणाले.
विठुरायाचे खोक्यांकडे आणि बोक्यांकडेही लक्ष
”विठोबा हे महाराष्टाराचं आराध्य दैवत आहे. पांड़ुरंग डोळे उघडे ठेवून प्रत्येक घडामोडीकडे पाहतोय. तो खोक्यांकडेही पाहतोय व तेलंगणाच्या बोक्यांकडेही पाहतोय” असा इशाराही त्यांनी मिंधे भाजप सरकारला दिला आहे.
मोर्चा हा होणारच
शिवसेनेचा 1 जुलैला महापालिकेवरील मोर्चा हा होणारच असल्याचा विश्वास यावेळी संजय राऊत यांनी व्यक्त केला. मुसळधार पावसातही मुसळधार मोर्चा होणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.































































