संपूर्ण सरकारवर ईडी कारवाई करा! महाराष्ट्र इतका कलंकित कधीच झाला नव्हता!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र फडणवीस हे दुधाने आंघोळ करतात, त्यांच्या घरात अमृतधारा वाहते. ते चारित्र्यवान व्यक्ती आहेत. अशा चारित्र्यवान व्यक्तीच्या बाजुला भ्रष्टाचारी, व्याभिचारी, बलात्कारी असे सगळे कलंकित लोकं बसले आहेत. या लोकांना घेऊन महाराष्ट्रात एक कलंकित सरकार स्थापन झालेलं आहे, अशा घणाघाती शब्दात शिवेसना नेते, खासदार संजय राऊत यांनी शिंदे भाजप, अजित पवार गटाच्या सरकारला फटकारले आहे. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कलंकित वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं.

”देशातील केंद्रीय तपास यंत्रणांनी हे सरकार कलंकित आहे, असं सांगितलं आहे. हा जो मनी लाँडरिंगचा कायदा (पीएमएलए कायदा) आहे त्या कायद्यात स्पष्ट म्हटलं आहे की एखाद्या कलंकित खात्यातून गुन्हेगारी स्वरुपाचा पैसा दुसऱ्या खात्यात गेला असेल तर ती व्यक्ती सुद्धा या कायद्यानुसार गुन्हेगार ठरते. हा ईडीचा कायदा आहे. त्यामुळे अनेक लोकं कारण विनाकराण तुरुंगात आहेत. या सरकारमध्ये फक्त पैसाच नाही तर ती कलंकित खाती व ते खातेदारच सामिल झाले आहेत. कुणी इक्बाल मिर्चीचा पैसा घेऊन गेलाय, कुणी साखर कारखान्याचे पैसे, शिखर बँकेचे पैसे, जरंडेश्वरचे पैसे, मनी लाँडरिंगचे पैसे घेऊन सरकारमध्ये सामिल झाले आहेत. या सरकारमधील जवळपास 14 ते 15 लोकांवर ईडीच्या कारवाया सुरू आहेत. त्यांच्याकडे गुन्हेगारी स्वरुपाचे पैसे होते. ते त्या पैशांसह सरकारमध्ये सामिल झाले. त्यामुळे या संपूर्ण सरकारवर ईडीने कारवाई करावी. या संपूर्ण सरकारालाच आरोपीच्या कठड्यात उभं केलं पाहिजे. हे संपूर्ण सरकार कलंकित आहे. अशा कलंकित सरकारवर काय बोलायचं. महाराष्ट्र इतका कलंकित कधी झाला नव्हता, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

”आतापर्यंत एखाद दुसऱ्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहे. पण थेट गुन्हेगारी स्वरुपाचा पैसा घेऊन सरकारमध्ये सामिल होणं असा गंभीर प्रकार महाराष्ट्रात झालेला नव्हतं. इतक्या कलंकित सरकारमध्ये आमचे स्वच्छ देवेंद्र फडणवीस अंगाला हळद लावून बसले आहेत. पण ती हळद पिवळी नसून काळी आहे. कलंकित हळद लावली आहे. एवढे ते चारित्र्यवान. नितिमत्तेचे गप्पा मारणारे. यांनीच अजित पवार, हसनमियाँ मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे या सगळ्यांसह अनेकांविरोधात भ्रष्टाचाराच्या मोहिमा राबवल्या, त्यावेळी हे सर्व कलंकित लोकं आहेत असे ओरडत होते. आता त्यांच्यासोबतच तुम्ही सरकारमध्ये बसला आहात. त्याच्यामुळे आपण सरकारसुद्धा कलंकित केलंय आणि महाराष्ट्र सुद्धा कलंकित केलाय, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने (हिंद स्वराज्य संघ) देण्यात येणारा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला आहे. त्याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ”मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना व त्यांना हा पुरस्कार जाहीर करणाऱ्यांना मी लोकमान्य टिळकांचं चरित्र पाठवणार आहे. मी संपूर्ण भाजपच्या प्रमुखांना देखील मी टिळकांचं चरित्र पाठवणार आहे. टिळकांचा संघर्ष, त्यांची लोकशाहीबाबतची भूमिका, त्यांचा लढा या सगळ्या गोष्टी पुरस्कार देणाऱ्यांनी व घेणाऱ्यांनी समजून घेतल्या पाहिजेत”.