
तुम्ही भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात असेल, अशी फडणवीसांची भूमिका आहे. मंत्रालयात पोलीस मंत्र्याच्या कार्यालयात घुसतात व त्या मंत्र्यावर काहीही कारवाई होत नाही. यावरून स्पष्ट होते की फडणवीस भ्रष्टाचाराच्या बाबतीत अत्यंत ढोंगी आहेत, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. मंत्रालयात नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लाचलुचपत खात्याच्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ताशेरे ओढले. यावेळी त्यांनी ”सुनेत्रा पवारांच्या एका मंत्र्याची शेंडी फडणवीसांच्या हातात आहे”, असा टोलाही लगावला.
”नरहरी झिरवाळ प्रकरणी एसीबीने कारवाई केली. यावरचा सामनाचा अग्रलेख वाचला असेल त्यात मी एक भूमिका घेतली होती. देवेंद्र फडणवीस मंत्र्यावर कारवाई करतात व नंतर त्यांना क्लिन चीट देत त्यांची शेंडी आपल्या हातात ठेवतात. सुनेत्रा पवारांच्या एका मंत्र्याची शेंडी सध्या फडणवीसांच्या हातात आहे. मंत्र्याच्या कार्यालयात लाचलुचपत होते. पोलीस कार्यालयात घुसतात. त्या मंत्र्यावर कारवाई न होता त्याची शेंडी फडणवीस हातात ठेवतात. तुम्ही भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात असेल, अशी फडणवीसांची भूमिका आहे. सुनेत्रा पवारांच्या एका मंत्र्याची शेंडी फडणवीसांच्या हातात आहे. फडणवीस भ्रष्टाचाराच्या बाबतीत अत्यंत ढोंगी आहेत’, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
” महाराष्ट्राच्या मंत्रालयाच्या प्रत्येक दालनात धाडी घालावा इतका भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दालनात देखील आहे. पण तिथे व्हाईट कॉलर आहे. मंत्रालयातील प्रत्येक दालनात भ्रष्टाचार आहे. झिरवळ बिचारे आदिवासी. त्यांना तितके प्लॅनिंग करायला जमले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आदिवासीचा बळी दिला. जवळ जवळ 100 टक्के मंत्री भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत. मुख्यमंत्र्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचं जरी लक्ष असलं तरी मुख्यमंत्री इशारा करत नाही तोपर्यंत पोलीस कोणत्याही दालनात घुसणार नाहीत”, असे संजय राऊत म्हणाले.



























































