फक्त खासदारांचाच नाही तर, शिंदेंचाही पत्ता कट होणार; संजय राऊत यांचं मोठं विधान

महायुतीत लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून मिंधेंच्या खासदारांची म्हणजेच गद्दारांची मोठी अडचण झाली आहे. काही खासदारांचे तिकीट कापले जाण्याची चिन्हे आहेत. उमेदवारी मिळत नसल्याने मिंधेंच्या गटात मोठी अस्वस्थता आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार संजय राऊत यांनी मिंधेंसह गद्दारांवर सडकून टीका केली आहे.

‘गद्दारांसाठी दरवाजे बंद’

कोणत्याही गद्दारासाठी दरवाजे उघडे नाहीत. दरवाजा ठोका, दारात बसा, छाती पिटा, गद्दारांना दरवाजे उघडे नाहीत. आम्ही भविष्यात गद्दारांसाठी दरवाजे उघडे ठेवले तर, जे निष्ठावान, स्वाभिमानी आणि प्रामाणिक जनता आणि शिवसैनिक, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वखाली आम्ही एकत्र आलो आहोत, हा त्या जनतेचा आणि शिवसैनिकांचा अपमान ठरेल, असे संजय राऊत म्हणाले. नाशिकमधील खासदार हेमंत गोडसे यांच्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला संजय राऊत यांनी रोखठोक उत्तर दिले.

‘शिंदेंचाही पत्ता कट होणार’

फक्त त्यांच्या खासदारांचाच नाही तर, शिंदेंचाही पत्ता कट होतोय. तुमच्या माहितीसाठी सांगतो. (शिंदेंना डावलून नेते फडणवीसांच्या भेटीला जात आहेत.) योग्यतेनुसार लोक जात असतात. कोण निर्णय घेऊ शकतं? तिकडेच लोक जातात. लोक कळसुत्री बाहुल्यांकडे जात नाहीत. किंवा बोलक्या बाहुल्यांकडे जात नाहीत. जो बाहुल्यांची सुत्रे हलवतो, त्याच्याकडे लोक जातात, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी मिंधेंवर केला. भाजपचे उन्मेश पाटील यांनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहितीही खासदार संजय राऊत यांनी दिली.

‘प्रकाश आंबेडकरांशी संवाद साधण्यास इच्छुक’

जागांचा जो प्रस्ताव आहे तो आमच्याकडून त्यांना (प्रकाश आंबेडकर ) गेला. त्यांच्याशी चर्चा अजिबात थांबवलेली नाही. आम्ही आजही त्यांच्याशी संवाद साधण्यास इच्छुक आहोत. प्रकाश आंबेडकर यांनीही सर्वत्र उमेदवार दिले आहेत. वंचित चर्चा करत नाही म्हणून आम्ही देशात निवडणुका लढायच्या नाहीत का? चर्चा होऊ शकते. अकोल्याच्या पलीकडेही चर्चा होतात. 48 मतदारसंघ आहेत, असे संजय राऊत म्हणाले.

देशाच्या संविधानासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी जनता आणि देशहितासाठी आपण एकत्र यायला पाहिजे. जो वंचित, पीडित समाज आहे त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. यामुळेच आम्ही त्यांच्याशी चर्चाही केली आहे. आमच्या मनात काही खोट नाही. पारदर्शकपणे चर्चा केली आहे. आम्ही 5 जागांचा प्रस्ताव दिला होता. त्यात अकोला, रामटेकसह इतरही चांगल्या जागा देण्याचा आम्ही प्रयत्न केला. असं असलं तरी चर्चा थांबली असं होत नाही, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी भूमिका स्पष्ट केली.