सेंट्रल आर्म फोर्स विधेयकावरून संजय राऊत यांनी सरकारला सुनावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेंट्रल आर्म फोर्स विधेयकावर आज राज्यसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले आहे. यावेळी त्यांनी ‘जर सरकारने हे बिल आणले तर तो केंद्रीय सुरक्षा पोलीस दलाच्या जवानांवर अन्याय होईल व त्यामुळे जवानांमध्ये असंतोष पसरेल. जर फोर्सेस मध्ये असंतोष राहिला तर त्यांच्या हातातील बंदूकांचा दुरुपयोगही होऊ शकतो’, असा इशारा देखील दिला आहे.

”सेंट्रल आर्म पोलीस फोर्सचे जे बिल तुम्ही आणलं आहे, त्याद्वारे तुम्ही केंद्रीय सुरक्षा दलांना वन अंब्रेला लॉच्या अंतर्गत आणायचा प्रयत्न करताय. BSF, CRPF, CISF, ITBP, SSB अशा मोठ्या संस्थानांना तुम्ही त्या अंतर्गत आणायचा प्रयत्न करताय पण या सर्व संस्थानात इतका असंतोष आहे की तुमची अंब्रेलाच तुटून जाईल किंवा उडून जाईल. सर्व फोर्समध्ये असंतोष आहे. हे एका फोर्सची कमान आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न आहे आणि हे चुकीचे आहे. हे बिल CAPF कॅडरच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही तर न्याय भावनेच्या विरोधात आहे. ज्या फोर्सने आतापर्यंत शेकडो बलिदान दिले आहेत. त्या बलिदानाविरोधात आहे”, असे ते म्हणाले.

पुढे त्यांनी या बिलाबद्दल सांगताना गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील निशाणा साधला. ”हे बिल नक्की काय आहे त्याचे मी उदाहरण देतो. अमित शहा हे देशाचे गृहमंत्री आहेत. दिवसरात्र मेहनत करतात. देशाच्या सुरक्षेसाठी समर्पित आहेत. 370 हटवलं, कायदा सुव्यवस्था सांभाळतात व भाजपला जिंकवायला खूप मेहनतही घेतात. ईडी, निवडणूक आयोग सीबीआय, सुप्रीम कोर्टला असं काही मॅनेज करतात की अजून कुणी मॅनेज नाही करू शकतात. गृह मंत्रालयाच्या माध्यमातून पार्टी फोडतात. आणि आपलं सरकार आणतात. पण अचानक पीएमओकडून एक ऑर्डर येते की योगी किंवा फडणवीस दिल्ली जाऊन गृहमंत्रालयाची कमान साभांळायला सांगितले जाते. पण अमित शहा आपलं काम करत राहतात. हे बिलतसंच आहे. CASF आपलं काम करत राहणार पण त्याची कमान आयपीएसकडे राहणार. कुठल्या एका मंत्रालयाची कमान दुसर्या मंत्रालयाला दिली तर किती गोंधळ उडेल. इथे तर पाच पाच फोर्सेसची कमान एका आयपीएस केडरच्या हातात देताय. आणि या फोर्सेसच्या अधिकाऱ्यांना बढतीसाठी पंधरा पंधरा वर्ष लागतात. अशा फोर्सवर अन्याय करू नका. ही तिच फोर्स आहे जे संसद, एअरपोर्ट आपल्या सर्वांची सुरक्षा करतेय. हे गंभीर बिल आहे याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. जर फोर्सेस मध्ये असंतोष राहिला तर त्यांच्या हातातील बंदूकांचा दुरुपयोगही होऊ शकतो. यावर चर्चा व्हायला हवी”, असेही ते म्हणाले.