
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार गटाची असल्याचा निर्णय गुरुवारी दिला. तसेच त्यांनी अजित पवार गट व शरद पवार गट दोन्हीचे आमदार पात्र ठरवले आहे. ज्या प्रकारचा निर्णय शिवसेनेच्या बाबतीत दिला होता तसाच निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत देण्यात आला. या निर्णयावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. ”राहुल नार्वेकर हे रामशास्त्री नाहीत तर ते दामशास्त्री आहेत”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
”राहुल नार्वेकर यांनी जो काही निर्णय दिलाय. आधी शिवसेने बद्दल आणि नंतर राष्ट्रवादीबद्दल दिला त्याने अजिबात कुणालाही धक्का बसलेला नाही. ना उद्धव ठाकरेंना बसलाय ना शरद पवारांना धक्का बसला. जो ठरलेला निर्णय होता. यांनी देवांची आळंदी चोरांची आळंदी करण्याचे ठरवले आहे. त्यांच्याकडून अजून कोणता निर्णय येऊ शकतो. हास्यजत्रा सिझन -2, लोकं मज्जा बघतायतय. या शतकातला सगळ्यात किरकोळ निर्णय आहे. याला काहीच ऐतिहासिक महत्त्व नाही.नना यात कोणताही अभ्यास नाही. समोर धडधडीत दिसतंय खून केलाय. लोकशाहीचा खून होतोय, एका पक्षाचा खून होतोय. आणि न्यायासनावर बसलेली व्यक्ती खुन्याला निर्दोष सोडतेय. चुलीत घाला तुमचा निकाल. विधानसभा अध्यक्ष हे रामशास्त्री नाहीत तर ते दामशास्त्री आहेत. मूळात हा निकालच नाही. त्यांनी निकाल दिला नाही तर फक्त वरून आलेला कागद त्यांनी वाचून दाखवला”, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.

























































