
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाच्या ‘अन्लाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी आणि ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्तीचे प्रकाशन दिल्लीत 23 मार्च रोजी होणार आहे. या पुस्तकाची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे.
नरकातला स्वर्ग या पुस्तकाची इंग्रजी व हिंदी आवृत्ती येणार हे जाहीर होताच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या पुस्तकाची प्रकाशनाआधीच देशभरात जोरदार चर्चा रंगली आहे. या पुस्तक प्रकाशनानंतर दिल्लीत मोठी खळबळ माजणार आहे असा दावा देखील अनेक वरिष्ठ पत्रकार व समिक्षकांनी केला आहे. त्यामुळे साऱ्या देशाचे या पुस्तकाच्या प्रकाश सोहळ्यावर लक्ष लागून आहे.
Unlikely Paradise! https://t.co/2dqL8WcuKg
— Sanjay Raut (@rautsanjay61) March 22, 2026
भाजपच्या सूडाच्या राजकारणातून ईडीने संजय राऊत यांना अटक केली होती. 100 दिवस त्यांना आर्थर रोड तुरुगांत ठेवण्यात आले होते. तुरुंगाच्या चार भिंतींच्या आतही त्यांची लेखणी थांबली नव्हती. तिथे आलेल्या अनुभवांना त्यांनी शब्दरूप दिले आणि त्यातूनच ‘नरकातला स्वर्ग’ हे पुस्तक साकारले. ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाची ‘अन्लाईकली पॅराडाईज’ ही इंग्रजी आणि ‘नरक में स्वर्ग’ ही हिंदी आवृत्ती प्रकाशनासाठी सज्ज असून राजधानी दिल्लीतील कॉन्स्टिट्युशन क्लब, मावळणकर सभागृह येथे सोमवार, 23 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता हा प्रकाशन सोहळा होणार आहे. खासदार, ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री, आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार असून मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, खासदार दिग्विजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेतील गटनेते डेरेक ओब्रायन, खासदार जया बच्चन, 4 PM न्यूजचे मुख्य संपादक संजय शर्मा यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती असणार आहे.
मराठीतील पहिल्या आवृत्तीला तुफान प्रतिसाद
पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन गेल्या वर्षी 17 मे रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत झाले. या पुस्तकाला दहा महिन्यांत वाचकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. विक्रमी खप झाला. देशभरात पुस्तकाची चर्चा झाली. त्यातून या पुस्तकाची हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीही प्रसिद्ध व्हावी, असा आग्रह होता. या विनंतीला मान देऊन संजय राऊत यांचे हे पुस्तक हिंदी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित करण्यात येत आहे.
दैनिक ‘सामना’ आणि न्यू ईरा पब्लिशिंगतर्फे ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तकाच्या हिंदी आणि इंग्रजी आवृत्तीचा प्रकाशन सोहळा होणार आहे. न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसचे प्रकाशक शरद तांदळे आणि दैनिक ‘सामना’च्या मार्केटिंग डेव्हलपमेंट विभागाचे नॅशनल हेड दीपक शिंदे हे या कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.

























































