
उपराष्ट्रपतीचा राजीनामा दिल्यापासून कोणालाच न दिसलेले व कोणाच्याही संपर्कात नसलेले जगदीप धनखड यांच्याविषयी चिंता व्यक्त करणारे पत्र शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना लिहिले आहे. धनखड यांचा ठावठिकाणा काय? त्यांना नजरकैदेत ठेवल्याची चर्चा आहे. ते खरे आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी शहांना केला आहे.
धनखड हे 22 जुलैपासून कोणाच्याही संपर्कात नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नाहीत. त्यांच्याशी किंवा त्यांच्या कर्मचाऱयांशीही कोणाचा संपर्क होत नाही, याकडे संजय राऊत यांनी शहा यांचे लक्ष वेधले आहे.
देशाला सत्य कळायलाच हवं!
‘धनखड यांच्या काळजीपोटी राज्यसभेतील आमचे काही सहकारी या प्रकरणी हेबियस कॉर्पस याचिका दाखल करण्याचा विचार करत आहेत. हे पाऊल उचलण्याआधी तुमच्याकडून माहिती मिळेल अशी अपेक्षा आहे. धनखड यांचे नेमके काय झाले? ते कुठे आणि कसे आहेत? या प्रश्नांची खरी उत्तरे देशाला मिळायलाच हवीत, असेही संजय राऊत पत्रात म्हटले आहे.