जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका! संजय राऊत यांचा इशारा

मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जात होती, निरपराध लोकांचे मुडदे पाडले जात होते, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी पुठे होते? असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. देशातील जनता संयमी आहे, पण मोदी सरकारने या संयमाचा अंत पाहू नये, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या रक्ताचा सडा पाडणाऱया पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणे हाच मोठा देशद्रोह असून सच्चे राष्ट्रभक्त हा सामना पाहणार नाहीत, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांच्या मणिपूर दौऱयावरून  त्यांनी टीकेची झोड उठवली. मोदींचा मणिपूर दौरा हे ढोंग आहे. हिंमत असेल तर मोदींनी धिंड काढलेल्या महिलांशी, हिंसाचारात ज्यांची मुले मारली गेलीत, त्यांच्या नजरेला नजर भिडवून बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले. मणिपूर दौऱयातून मोदी यांना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला होणाऱया विरोधावरचे लक्ष विचलित करायचे आहे, असा आरोपही त्यांनी केला.

आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषद घ्या 

मराठा आणि ओबीसी समाजामध्ये आरक्षणावरून संभ्रमाचे वातावरण आहे. हा संभ्रम घालवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मनोज जरांगे पाटील, छगन भुजबळ यांच्यासह पत्रकार परिषद घ्यावी आणि लोकांच्या शंका दूर कराव्यात, असे संजय राऊत म्हणाले. पत्रकार परिषदेसाठी तुमच्याकडे जागा नसेल तर शिवसेना भवनात घ्या, आम्ही चहापानासह सर्व व्यवस्था करू. पण या विषयावरील संभ्रम दूर करावा. मोदींप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना घाबरू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

मुख्यमंत्री सक्षम, पण अंमलबजावणीत शून्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत. सर्व प्रश्न ते सहज सोडवू शकतात, पण अंमलबजावणीत ते शून्य आहेत. त्यामुळे लोकांचा संयम सुटत चालला आहे. जनतेचा संयम सुटल्यास काय होते, याचे नेपाळ हे उदाहरण आहे. नेपाळमधील तरुणांनी क्रांती करून भ्रष्ट राजवट उलथून टाकली. ही क्रांती पाहून राज्यातील भ्रष्टाचारी मंत्र्यांनी सावध झाले पाहिजे, जनतेच्या संयमाचा अंत सरकारने पाहू नये, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.