
आपल्या परवानगीशिवाय बैठका घ्यायच्या नाहीत असे पत्र सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पाठवल्याने वाद निर्माण झाला आहे. मिंधे गटाचे नेते असलेल्या शिरसाट यांची ती दादागिरी मोडून काढत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिरसाट यांना चांगलीच चपराक लगावली. राज्यमंत्र्यांनाही बैठका घेण्याचा अधिकार आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.
माधुरी मिसाळ यांनी शिरसाट यांना पत्र पाठवून आपल्यालाही बैठका घेण्याचा अधिकार असल्याचे म्हटले होते. देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी यासंदर्भात विचारले असता, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री हे एकाच शासनाचे भाग असतात. सगळे अधिकार हे कॅबिनेट मंत्र्यांकडे असतात. ते जो अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. त्यामुळे राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे फडणवीस म्हणाले.
धोरणात्मक निर्णय कॅबिनेट मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाहीत किंवा ते घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता लागते. त्यामुळे पत्र लिहून वाद निर्माण करण्यापेक्षा मंत्र्यांनी आपापसात चर्चा करावी आणि काही समस्या असतील तर मला सांगाव्यात, असा सल्लाही फडणवीस यांनी दिला.