
सामना ऑनलाईन । लखनौ
रामलल्लामुळे सत्ता मिळते आणि जातेही. 2019 मध्ये होणाऱया निवडणुकीत भाजपची सत्ता येणार नाही अशी शापवाणी संतांनी काढली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत बोलताना राममंदिराच्या निर्माणावर गोलमाल भाषा वापरल्याने संतमहंतांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे शनिवारी अयोध्येत होते. यावेळी राममंदिरासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी जे कार्य होणार आहे ते होणारच आहे. ते कुणीही टाळू शकत नाही. नियतीने जे ठरवले आहे ते होणारच अशी गोलमाल भाषा वापरली होती. योगी आदित्यनाथ यांचा बदललेला रंग पाहून संत संतापाने लालेलाल झाले आहेत. रामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांनी अत्यंत जहाल शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली. दोन खासदारांपासून 180 खासदार होण्याची कृपा रामलल्लाची आहे. केवळ रामलल्लामुळेच भाजपला सत्तेची चव चाखायला मिळाली. परंतु सत्तेवर येताच याच नेत्यांची भाषा बदलली आहे. सरडय़ालाही लाज वाटावी असा रंग या नेत्यांनी बदलला आहे असे सतेंद्र दास म्हणाले. भाजप नेत्यांच्या भाषेत झालेला बदल म्हणजे रामलल्लासोबत धोका असल्याची तोफही त्यांनी डागली.
श्रीराम जन्मभूमी न्यासाचे ज्येष्ठ सदस्य कमलनयन दास यांनीही योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे समर्थन केले. योगींच्या मनात राममंदिर व्हावे अशी तीक्र इच्छा आहे. संत समाजालाही राम मंदिर प्रकरणात ऑक्टोबरपर्यंत न्यायालयाचा निकाल येण्याची अपेक्षा आहे. ऑक्टोबरपर्यंत निकाल न आल्यास संतमंहत, हिंदू समाज राममंदिरासाठी पूर्णतः तयार असल्याचेही ते म्हणाले.
भाजपला रामाचाही विसर – परमहंस
अयोध्येतील तपस्वी छावणीचे महंत स्वामी परमहंस यांनीही मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानावर संताप व्यक्त केला. भगवान राम यांच्यामुळे आपण सत्तेवर आलो याचा विसर भाजपला पडला, असेही ते म्हणाले. अयोध्येत राममंदिराचे निर्माण करणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कर्तव्यच असल्याचेही त्यांनी बजावले. दुसरीकडे बाबरी मशिदीचे पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे समर्थन केले.
























































