कलिना येथे व्यावसायिक इमारतीला भीषण आग,कोट्यवधीचे सामान जळून खाक

सांताक्रुझ येथील कलिना परिसरातील व्यावसायिक इमारतीला शनिवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत इमारतीतील कोटय़वधी रुपयांचे फर्निचरचे सामान जळून खाक झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने चार फायर इंजिनच्या सहाय्याने जवळपास दोन तासांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

कलिना परिसरातील सीएसएमटी रोडवरील ‘एमजीईएन चेंबर्स’ नावाच्या सहामजली व्यावसायिक इमारतीला ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र इमारत संपूर्ण काचेने झाकली होती. त्यामुळे अग्निशमन दलाला आग विझवणे कठीण झाले होते. जवळपास दोन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. काही मिनिटांत उग्र रूप धारण केलेल्या आगीत इमारतीतील विजेचे वायरिंग, कार्यालयीन फायली आणि रजिस्टर, लाकडी फर्निचर, संगणक, दरवाजे, खिडक्या, खुर्च्या, काचेचे दर्शनी भाग आणि छत अशा प्रकारे कोटय़वधी रुपयांचे सामान जळून खाक झाले. ही व्यावसायिक इमारत असल्यामुळे रात्री कोणतेही कर्मचारी नव्हते. त्यामुळे जीवितहानी टळली, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

अंधेरीत होरपळलेल्या महिलेचा मृत्यू; दोघे गंभीर

अंधेरी पूर्वेकडील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये लागलेल्या आगीत होरपळलेल्या महिलेचा मृत्यू झाला, तर इतर दोघांची प्रकृती गंभीर आहे. 21 डिसेंबर रोजी आगीची घटना घडून तिघेजण होरपळले होते. विनिता भोईटे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. आगीत ती गंभीररीत्या भाजली होती. तिच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू होते. तसेच 75 वर्षीय नामदेव काशीनाथ सकपाळ आणि 70 वर्षीय लक्ष्मी नामदेव सकपाळ हे दोघे गंभीर जखमी आहेत. त्यांना कस्तुरबा रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर ठेवले आहे.