
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडला बीड जिल्हा व विशेष सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. त्याच्या जामीन अर्जावर शनिवारी (30 ऑगस्ट 2025) सुनावणी पार पडली असून न्यायालयाने वाल्मीक कराडचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. वाल्मीक कराडवर गंभीर गुन्हा दाखल असल्यामुळे त्याचा अर्ज फेटाळून लावत असल्याचे निरीक्षण यावेळी न्यायालयाने नोंदवले आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी वाल्मीक कराडसह पाच आरोपींना अटक केली आहे. मात्र एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा शोध पोलिसांच्या माध्यमातून घेतला जात आहे. दरम्यान, वाल्मीक कराडच्या वकीलाने मागील सुनावणीत या प्रकरणात त्याचा संबंध कसा नाही, हे पटवून देण्यासाठी जवळपास तीन तास युक्तिवाद केला होता. तसेच त्याला जामीन मिळावा म्हणून विशेष न्यायालयात अर्ज सुद्धा दाखल केला होता. परंतु वाल्मीक कराडवर गंभीर गुन्हा दाखल असल्यामुळे त्याचा अर्ज फेटाळून लावत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. तसेच या प्रकरणातील काही आरोपींनी केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जावरील सुनावणी 10 सप्टेंबरला होणार आहे.