
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान नाबार्ड आणि जिल्हा परीषदरत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.30 डिसेंबर ते 3 जानेवारी दरम्यान गणपतीपुळे येथे महिला बचतगटाच्या उत्पादनांना प्रोत्साहन देणारे रत्नागिरी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा परीषद अध्यक्ष स्वरुपा साळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. वर्षअखेरीसाठी कोकणात येणाऱ्या पर्यटकांना सरस प्रदर्शनाच्या माध्यमातून कोकणी मेवा आणि महिला बचतगटांच्या उत्पादनांचा आस्वाद घेता येणार आहे.
पत्रकार परिषदेत जिल्हा परीषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी गणपतीपुळे येथे होणाऱ्या रत्नागिरी सरस प्रदर्शनाची माहिती सांगितली. दि.30 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या हस्ते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सरस प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत आणि रत्नागिरी जिह्यातील सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत.
या प्रदर्शनामध्ये 85 महिला बचतगट सहभागी होणार आहेत. त्यामध्ये बचतगटांनी बनवलेल्या कलात्मक वस्तू, मसाले, पीठ, पापड, कोकणी मेवा, विविध फळांची सरबते यांचा समावेश असणार आहे. यावेळी राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचे वितरण होणार असल्याची माहिती साळवी यांनी दिली. यावेळी जिल्हा परीषदमुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, प्रकल्प अधिकारी विवेक परळीकर उपस्थित होते. 5 दिवस चालणाऱ्या या रत्नागिरी सरस प्रदर्शनात उत्कृष्ट मांडणी असणारा बचतगट आणि सर्वाधिक विक्री करणारा बचतगट यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच खरेदीदार आणि विक्री करणारे यांचा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे आहेत.
मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथील मौलाना आझाद स्वयंसहायता बचत गट, अडखळ येथील जिजामाता स्वयंसहायता बचत गट, भोळवली येथील जिजामाता स्वयंसहायता बचत गट. दापोली तालुक्यातील आंबवली येथील श्रीराम स्वयंसहायता बचत गट, जालगाव येथील शिवसमर्थ स्वयंसहायता बचत गट, कुंभवे येथील विश्वकला स्वयंसहायता बचत गट. खेड तालुक्यातील मुंबके अंतुले मोहल्ला येथील रमजान स्वयंसहायता बचत गट, गुणदे येथील भाग्यलक्ष्मी स्वयंसहायता बचत गट, मुंबके येथील संघमित्र स्वयंसहायता बचत गट. चिपळूण तालुक्यातील पाथर्डी मिरवणे येथील भरारी स्वयंसहायता बचत गट, पिंपळी बु.येथील विठाई स्वयंसहायता बचत गट, कापसाळ येथील जय हनुमान स्वयंसहायता बचत गट. गुहागर तालुक्यातील पालकोट त्रिशुल येथील सिध्दीविनायक स्वयंसहायता बचत गट, धोपावे तेटले येथील इंदिरा विकास स्वयंसहायता बचत गट आणि रमाई स्वयंसहायता बचत गट. राजापूर तालुक्यातील सौंदळ येथील श्रीमहालक्ष्मी स्वयंसहायता बचत गट, येळवण येथील श्री जुगाईदेवी स्वयंसहायता बचत गट, वाटूळ येथील मितवा स्वयंसहायता बचत गट. रत्नागिरी तालुक्यातील जुवे येथील तुळजाभवानी स्वयंसहायता बचत गट, नाणीज येथील यश स्वयंसहायता बचत गट, वळके येथील वाघजाई स्वयंसहायता बचत गट. लांजा तालुक्यातील बापेरे येथील ओम स्वयंसहायता बचत गट, हर्चे येथील समर्थकृपा स्वयंसहायता बचत गट, खानवली येथील महालक्ष्मी स्वयंसहायता बचत गट. संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील प्रेरणा स्वयंसहायता बचत गट, मुशी येथील ज्योतिबा स्वयंसहायता बचत गट, ताम्हाणे येथील सवित्रीबाई स्वयंसहायता बचत गट तसेच संगमेश्वर तालुक्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया देवरुखचे शाखा व्यवस्थापक अमोल शांडगे यांना उत्कृष्ट बँक शाखा व्यवस्थापक पुरस्कार आणि चिपळूण तालुक्यातील दैनिक पुढारीचे पत्रकार राजेश जोष्टे यांना सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर झाला आहे.
डी मार्टसह अन्य ठिकाणी बचतगटासाठी प्रयत्न सुरु
जिल्हा परीषदमुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले की, महिला बचतगटांच्या उत्पादनाला डी मार्ट, एम मार्ट, अपना बाजार अशा ठिकाणी विक्रीसाठी उपलब्धता मिळावी याकरीता आम्ही प्रयत्न करत आहोत. ते जर यशस्वी झाले तर अशा मोठ्या मॉल किंवा दुकानांमध्ये महिला बचतगटांची उत्पादने दिसतील. मात्र त्यांना ज्या अटी शर्ती असतील त्यांची पुर्तता करावी लागेल असे त्यांनी सांगितले. महिला बचतगटांच्या उत्पादनांना योग्य वेष्टन असणे आवश्यक आहे. त्याकरीताही आमचे प्रयत्न सुरु आहेत असे गोयल म्हणाल्या.
































































