
रोहित शर्मा व विराट कोहली हे स्टार खेळाडू कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने टीम इंडियात त्यांची जागा घेण्यासाठी आता खेळाडूंमध्ये रस्सीखेच बघायला मिळणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी लवकरच जाहीर होणाऱ्या हिंदुस्थानी संघात त्याचे पडसाद दिसणार आहे. त्या पार्श्वभूमीवर धडाकेबाज फलंदाज सरफराज खानने संघातील आपले वजन वाढवण्यासाठी तब्बल दहा किलोंनी आपलं वजन घटवलं असून तो टीम इंडियात स्थान मिळविण्यासाठी सध्या चांगलाच घाम गाळत आहे.
टीम इंडिया इंग्लंडच्या भूमीवर नवीन कसोटी कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळेल. इंग्लंडला जाण्यासाठी निवडकर्त्यांना प्रभावित करण्यासाठीच सरफराज खानने वजन जवळपास 10 किलो कमी केले आहे. तो दिवसातून दोनदा सराव करत आहे. इंग्लंडमध्ये ऑफ-स्टंपच्या बाहेर स्विंग होणाऱ्या चेंडूंना तोंड देण्यासाठी मुंबईच्या 27 वर्षीय फलंदाज चांगली तयारी करत आहे.
विराटची जागा कोण घेणार?
कसोटी क्रिकेटमध्ये विराट कोहलीची जागा कोण घेईल हा सध्याचा सर्वात पुतुहालाचा विषय आहे. चौथ्या क्रमांकावर कोहलीची जागा घेण्यासाठी के. एल. राहुल आणि शुभमन गिलची नावे आघाडीवर असली तरी सरफराज खानही या स्थानावर खेळण्यासाठी मोठा दावेदार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या हिंदुस्थान ‘अ’ संघात सरफराज खानचा समावेश करण्यात आला आहे. आता त्याला मुख्य संघात स्थान मिळते की नाही हे पाहणे रंजक ठरेल. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या हिंदुस्थान संघाचा सरफराज भाग होता, मात्र त्याला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत सरफराजने शानदार शतक झळकावले होते.





























































