आजऱयाच्या ‘सर्फनाला’मध्ये यावर्षी पाणी अडवलेच नाही, आमदार प्रकाश आबिटकरांचा बार ठरला फुसका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजरा तालुक्यातील बहुचर्चित आणि प्रलंबित सर्फनाला प्रकल्पात यावर्षीही पाणी अडवण्यात आले नाही. आता पावसाळ्याच्या तोंडावर ही कार्यवाही अशक्य आहे. गेल्या वर्षी आजरा-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी आजरा कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स वेल्फेअर असोसिएशनच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी ही घोषणा केली होती. त्याबाबत घोषणा करण्याआधी आमदारांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले असल्याचे चित्र अधोरेखित झाले आहे. त्यामुळे आमदार प्रकाश आबिटकरांचा बार फुसका ठरल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

सर्फनालाच्या बुडीत क्षेत्रातल्या पारपोली, खेडगे गावठाण हद्दीतील घरे आणि जमीन संपादन करण्यासाठी संयुक्त मोजणी झाली; पण प्रक्रिया सदोष आणि प्रकल्पग्रस्तांवर अन्याय करणारी होती. त्या प्रक्रियेची चौकशी व्हायला हवी तसेच प्रक्रियेतील चुकांची दुरुस्ती होऊन, योग्य पद्धतीने जमीन-घरांचे संपादन होण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांनी लावली आहे, यासाठीची निवेदने जिल्हाधिकाऱयांना देण्यात आली आहेत.

तालुक्याच्या पश्चिम सीमेवर अगदी कोकणालगत होत असलेल्या सर्फनाला प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातल्या पारपोली, खेडगे गावठाण या गावांतील शेतजमिनीचे संपादन पूर्वीच झाले असताना पुन्हा झालेल्या सर्वेक्षणात चुका झाल्याची तक्रार कायम आहे. कारण गावठाणच्या हद्दीलगतच्या पूर्वी संपादन केलेल्या गटनंबरमधील जमिनी व घरांच्या नोंदी यामध्ये घालण्यात आल्या आहेत आणि गावठाण हद्दीतील संपादन न झालेली घरे-जमिनी वगळलेली असल्याचे आढळल्याने प्रकल्पग्रस्तांना याबाबत योग्य कार्यवाही अपेक्षित आहे.

आमदार आबिटकर गेल्या वर्षीच्या जाहीर कार्यक्रमात म्हणाले होते, कोरोनामुळे आलेल्या अडचणींचा सर्वांत मोठा फटका सर्फनाला प्रकल्पाला बसला आहे. निविदा आणि बजेटसारख्या बाबी पूर्ण असूनही पाणी अडवता आले नसले तरी पुढील वर्षी या प्रकल्पात निश्चितपणे पाणीसाठा होईल, असे सांगितले होते. पण त्यांनी केलेल्या घोषणेचा त्यांनाच विसर पडल्याचे दिसत आहे. या बरोबरच प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबतची आवश्यक कार्यवाही आमदारांकडून झालेली नाही, ही वस्तुस्थिती समोर आली आहे.