
सामना प्रतिनिधी । बुलढाणा
राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने नुकतीच बालविवाहबाबत अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार जिल्ह्यात अजूनही बाल विवाहाचे प्रमाण लक्षणीय आहे. यापुढे बाल विवाहावर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज आहे. जिल्ह्यात भविष्यामध्ये कुठल्याही ग्रामपंचायत क्षेत्रात बालविवाह झाल्याचे निर्दशनास आल्यास संबंधित ग्रामपंचायतीच्या सरपंचाचे पद रद्द करण्यात येईल. तसेच नागरी भागात बालविवाह झाल्याचे निष्पन्न झाल्यास नगर पालिका नगरसेवकांचे पद रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे यांनी दिले आहे.
जिल्हास्तरावर बाल विवाह रोखण्यासाठी बालविवाह प्रतिबंध बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली 29 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील –भुजबळ, युनीसेफचे प्रतिनिधी पवनीकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रमोद येंडोले, शिक्षणाधिकारी, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष, विवाह लावणारे विविध धर्माचे प्रतिनिधी व बाल विवाह प्रतिबंध क्षेत्रात काम करणार्या सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
येणार्या 2 ऑक्टोंबर रोजी आयोजित ग्रामसभांमध्ये बाल विवाहाबाबत जनजागृतीपर कार्यक्रम घेण्याच्या सूचना करीत जिल्हाधिकारी म्हणाल्या, “ग्रामसभांनी आपल्य ठरावात बाल विवाह जनजागृती कार्यक्रमाची नोंद घेवून बाल विवाह न होण्यासाठी आपल्या स्तरावर कारवाई करावी. बाल विवाह संपन्न करण्यासाठी मदत करणार्या व्यक्तींविरूद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. बालविवाह संपन्न होत असल्यास किंवा होणार असल्यास नागरिकांनी संबंधित गावचे सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस स्टेशन कर्मचारी, नगर पालिका असल्यास मुख्याधिकारी, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांना कळवावे” असे त्या म्हणाल्या.
तसेच बालविवाह रोखण्यासाठी विवाह यंत्रणेतील मंडप प्रतिनिधी, प्रिटींग प्रेस, फोटोग्राफर, लग्नविधी पार पाडणारे विविध धर्माचे प्रतिनिधी, भोजन व्यवस्थापक यांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच “विवाह विषयक सेवा व सामुग्री पुरविण्यापूर्वी संबंधित वधु वरांचे जन्म प्रमाणपत्र तपासून वधु-वर वयस्क असल्याची खात्री करावी.” तसेच कागदपत्रांची नोंद ठेवावी. अन्यथा चूक आढळल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी कारवाईचा इशारा त्यांनी दिला.



























































