सटाणा आरोग्य केंद्रातला गैरकारभार अजूनही सुरूच, आरोग्य सेविकेने मागितली लाच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, सटाणा

आरोग्य कर्मचाऱयात होणारे वादविवाद, वैद्यकीय अधिकाऱयांची अरेरावी तसेच गोरगरीब रुग्णांची उपचाराच्या नावाखाली होणारी अहवेलना यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नेहमीच चर्चेचा विषय ठरत आले आहे. याबाबत गोरगरीब नागरिक नेहमीच वरिष्ठांकडे तक्रारी करीत असतात मात्र यानंतरही या भ्रष्ट कर्मचारीवर्गाला लगाम लागत नसल्याचेच पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे. संतती नियमन शस्रक्रियेसाठी आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णाकडून आरोग्य सेविकेने तीन हजार रुपयांची मागणी केली. ती पूर्ण न झाल्याने या रुग्णाला चक्क शस्रक्रियेविनाच घरी पाठविण्याचा संतापजनक प्रकार शुक्रवारी सटाण तालुक्यातील विरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शुक्रवारी 18 जानेवारी रोजी संतती नियमन शस्रक्रियांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सय्यदपिंप्री येथील सर्जन मयुर आहिरे हे यासाठी आरोग्य केंद्रात सकाळपासूनच उपस्थित होते. तसेच गुरुवार सायंकाळपासून परिसरातील दहा महिला रुग्णांना संततीच्या शस्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते. यातील रौंदळ या महिला रुग्णाकडून आरोग्य सेविकेने 3 हजार रुपयांची मागणी केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी खुशाली व शस्रक्रियेत व्यवस्थित लक्ष दिले जावे यासाठी अडीच हजार रुपये दिले. यानंतर दाखल सर्व रुग्णांना भुलीचे इंजेक्शन देऊन शस्रक्रियांना सुरुवात करण्यात आली.

मात्र शस्रक्रियेपूर्वी अडीच हजार रुपयांची खुशाली देणाऱया या रुग्णाकडे उर्वरित पाचशे रुपयांची मागणी या महिला कर्मचारीकडून करण्यात आली. यावेळी परिवारातील कोणीही जेष्ठ पुरुष सदस्य इथे उपस्थित नव्हते. यामुळे येथील आरोग्य व्यवस्थापनाने चक्क शस्रक्रिया करण्यासच टाळाटाळ केली. व याच कालावधीत दिलेली भूलही उतरल्याने या रुग्णाला चक्क संततीनियमन शस्रक्रियेविनाच घरी पाठवण्यात आले.

शनिवारी हा प्रकार समजताच या रुग्णाच्या नातेवाईकांसह तरसाळी गावातील ग्रामस्थांनी आरोग्य केंद्र गाठून वैद्यकीय अधिकाऱयांसह आरोग्य कर्मचाऱयांना धारेवर धरले. यावेळी पैसे मागणाऱया महिला कर्मचारीने थेट वैद्यकीय अधिकारी देवरे यांचेच नाव सर्वांसमक्ष घेतल्याने विरगावचे सरपंच ज्ञानेश्वर देवरे, बाजार समिती संचालक प्रभाकर रौंदळ, सुधाकर पाटील यांनी देवरे यांना याबाबत जाब विचारला. अखेर पैसे मागणारी महिला कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱयांनी सर्वांची माफी मागितली. शुक्रवारी झालेल्या या शस्रक्रियांच्या वेळी दाखल झालेल्या गोरगरीब रुग्णांकडूनही सर्रासपणे एक हजार रुपये आरोग्य कर्मचाऱयांनी उकळल्याचेही यावेळी सर्वांसमक्ष उघड झाल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकाराकडे अखेर लक्ष घालणार तरी कोण, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.