
सातारा जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता आणण्याच्या भाजपच्या स्वप्नाला सुरुंग लागला. 65 सदस्यसंख्या असलेल्या सभागृहात भाजपचा वारू 27 जागांवर रोखला गेला. राष्ट्रवादीला 21, तर शिंदे गटाला 15 जागा मिळाल्या. भाजपचे मंत्री जयकुमार गोरे, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर तसेच शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांना या निवडणुकीत जोरदार धक्का बसला. अलीकडेच भाजपच्या आश्रयाला गेलेल्या पाटणकर गटाचाही धुव्वा उडाला.
मागील 25 वर्षांत सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला असताना जिल्हा परिषदेवर एकहाती सत्ता आणण्याच्या वल्गना भाजपकडून गेले काही दिवस केल्या जात होत्या. 65 पैकी 50 ते 55 जागा जिंकणारच, अशी भाजपच्या नेत्यांची भाषा होती. मात्र, जिल्हावासीयांनी भाजपचा वारू 27 जागांवरच रोखला. प्रचंड हवा करूनदेखील भाजपला 33 ही मॅजिक फिगरही गाठता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच शरद पवार पक्ष यांनी मतैक्य करून ही निवडणूक लढवली होती. काही प्रमाणात त्याचा फायदा झाल्याचे दिसले. राष्ट्रवादीला या निवडणुकीत 21 जागा मिळाल्या. शिंदे गटाने 15 जागा जिंकल्या. त्यामध्ये फलटणमधून रामराजे यांची बेरीज झाल्यामुळे मिळालेल्या पाच जागांचा समावेश आहे. काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली. एका जागेवर अपक्ष उमेदवाराने बाजी मारली.
कोरेगावात शिंदे गटाची पीछेहाट
शिंदे गटाचे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी खटावमधून भाजपतर्फे निवडणूक लढवत होत्या. त्या विजयी झाल्या. तथापि, कोरेगाव तालुक्यात त्यांची प्रचंड पीछेहाट झालेली पाहायला मिळाली. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा जागांपैकी राष्ट्रवादीने तीन व भाजपने एक जागा मिळवली. शिंदे गटाला दोन जागांवर समाधान मानावे लागले.
पक्षीय बलाबल
– भाजप – 27 – राष्ट्रवादी – 21 – शिंदे गट – 15 – काँग्रेस – 1 – अपक्ष – 1































































