
सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. संपदा मुंडे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी हातावर पेनाने सुसाईट नोट लिहून पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदाने यांनी चार वेळा बलात्कार केल्याचा आणि अन्य एकाने शारीरिक व मानसिक छळ केल्याचा आरोप केला. यामुळे एकच खळबळ उडाली असून विरोधक आक्रमक झाले आहेत. या घटनेमुळं गृहखात्याची अब्रू तर वेशीवर टांगली गेलीच पण पोलीसच असा अत्याचार करत असतील तर महिलांनी न्याय मागण्यासाठी जायचं कुठं? असा सवाल विरोधकांनी केला असून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याचीही मागणी केली.
आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक! – सुप्रिया सुळे
फलटण, जि. सातारा येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टरचे आत्महत्या प्रकरण अतिशय गंभीर आहे. या महिलेने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तिने गेली काही दिवसांपासून तिचा शारिरीक आणि मानसिक छळ होत असल्याचे वरीष्ठांना वारंवार कळविले होते. परंतु तिच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने टोकाचे पाऊल उचलले. या विषयाच्या मूळाशी नेमके कोणते कारण आहे? या महिलेच्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत. संबंधित महिलेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक आहे. माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आग्रही मागणी आहे की या प्रकरणाची चौकशी करुन दोषी व्यक्तींना कठोर शासन करावे. आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या तसेच राज्यातील प्रत्येक महिलेला सुरक्षित वातावरण मिळालेच पाहिजे ही आमची भूमिका आहे, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.
आरोपींवर कठोर कारवाई करा! – रोहित पवार
पीएसआय गोपाल बदने याने अत्याचार केल्याचं तर पोलीस प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचं हातावर लिहून ठेवत फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट बदलण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव आणला जात असल्याचं कळतंय आणि हे अत्यंत भयानक आहे. या घटनेमुळं गृहखात्याची अब्रू तर वेशीवर टांगली गेलीच पण पोलिसच असा अत्याचार करत असतील तर महिलांनी न्याय मागण्यासाठी जायचं कुठं? असा प्रश्न निर्माण होतो. राज्यातील सगळेच पोलीस वाईट नाहीत पण अशा नराधम पोलिसांमुळं चांगलं काम करणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांच्या नावाला काळीमा लागतो. या एकूणच प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि जनतेचे रक्षक असूनही भक्षक बनलेल्यांवर गुन्हा दाखल होऊन कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली.
…तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही! – वडेट्टीवार
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने फाशी घेत आत्महत्या केली. आत्महत्या करताना त्यांनी हातावर सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात उल्लेख आहे, पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने त्यांच्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने त्यांना सतत मानसिक त्रास दिला. पोलिसांचे काम हे रक्षण करण्याचे आहे पण तेच जर महिला डॉक्टरचे शोषण करत असतील तर न्याय मिळणार कसा? या मुलीने याआधी तक्रार करूनही कारवाई का झाली नाही? महायुती सरकार वारंवार पोलिसांना पाठीशी घालत आहे, त्यातूनच पोलिस अत्याचार वाढत आहे. या प्रकरणी नुसते चौकशीचे आदेश देऊन उपयोग नाही. या पोलिसांना नोकरीतून बडतर्फ केले पाहिजे, नाही तर तपासावर ते दबाव टाकू शकतात. आधी तक्रार करूनही त्याची दखल का घेण्यात आली. आधी, कोणी दुर्लक्ष केले, या पोलिसांना पाठीशी घालणाऱ्यांवर कारवाई केली पाहिजे. पोलिसांवर कारवाई होत नाही तोपर्यंत पोलिसी अत्याचाराला आळा बसणार नाही, अशी टीका काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली.

राज्य महिला आयोगाने घेतली प्रकरणाची दखल
दरम्यान, राज्य महिला आयोगानेही सदर प्रकरणाची दखल घेतली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने पोलिस निरीक्षक गोपाल बदने यांनी केलेल्या लैंगिक अत्याचारामुळे आत्महत्या केल्याचे त्यांच्या सुसाइड नोटमुळे समोर आले आहे. तसेच प्रशांत बनकर याने मानसिक त्रास दिल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली आहे. सद्यस्थितीत याप्रकरणी फलटण सिटी पोलीसमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (2) (N), 108 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांना अटक करण्यासाठी शोधपथक रवाना करण्यात आले आहे. मयत डॉक्टर यांचे शव विच्छेदनसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. फरार आरोपींचा तातडीने शोध घेऊन संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करावा असे निर्देश आयोगाने पोलीस अधीक्षक, सातारा यांना दिले आहेत. पीडित महिलेने याआधी त्यांना होणाऱ्या त्रासाबाबत तक्रार केली असल्यास त्यांना मदत का मिळाली नाही याचीही चौकशी व्हावी आणि संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशा सूचना आयोगाने पोलिसांना दिल्या आहेत, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली.




























































