झाडाने सोडली साथ, पण पारंब्याने दिला हात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निसर्गाने साथ दिली तर संकटावरही मात करता येते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. असाच नैसर्गिक चमत्कार खटाव तालुक्यातील पुसेगाव-वडूज रस्त्यावर काटकरवाडी या ठिकाणी पाहण्यास मिळत आहे.

पुसेगाव-वडूज रस्त्याचे विस्तारीकरण व दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे. यासाठी अनेक जुन्या झाडांची कत्तल करण्यात आली आहे. या रस्त्यावरील काटकरवाडीजवळील एक वडाचे झाड सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या झाडाच्या पारंब्यानेच एका वडाच्या झाडाला जीवदान दिले आहे.

खोडापासून फांदीला अलग केले असले, तरी या झाडाच्या पारंब्याने फांदीची गळाभेट घेऊन त्याला जीवदान दिले आहे. हिरव्यागार पानांनी बहरलेले आणि नारळाच्या झाडाच्या उंचीएवढे असलेल्या या वडाच्या झाडाने निसर्गाची किमया दाखवून दिली आहे. सध्या हे झाड प्रवाशांचे लक्ष वेधून घेत आहे, तर अनेकजण येथे आवर्जून सेल्फी घेत आहेत.

येथून रस्त्यावरून जाताना अगोदर पारंब्या दिसतात, नंतर तुटलेली फांदी व हिरव्या पानांचा गालिचा दिसतो. या झाडाच्या संरक्षणासाठी त्याच्याभोवती कुंपण घालून त्याची निगा राखावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू फडतरे, धनंजय चव्हाण व परेश जाधव यांनी केली आहे.