शहीद जवान सुरज यादव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दीमापूर (नागालँड) येथे देशसेवा बजावत असताना शहीद झालेले येरवळे (ता. कराड) येथील जवान सुरज मधुकर यादव यांचे पार्थिव दोन दिवसांनी आज सकाळी मुळगावी आणण्यात आले. विंग हाॅटेल ते येरवळे गावात अंत्ययात्रा काढत 11 वाजण्याच्या सुमारास शासकीय इतमामात सुरज यादव यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारोंच्या संख्येने उपस्थितानी जड अंतकरणानी अखेरचा निरोप त्यांना दिला.

वीर जवान सुरज यादव अमर रहे, वंदे मातेरमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर गहिवरून गेला. येरवळे येथील जवान सूरज यादव यांचे सोमवारी सांयकाळी दीमापूर ( नागालँड ) येथे सेवा बजावताना शहीद झाले. तेव्हापासून कुटूंबीयासह गावकऱ्यांचे डोळे त्या वाटेवरून येणाऱ्या जवानाच्या पार्थिवकडे लागून राहिले होते. आज पहाटे विमानाने त्याचे पार्थीव पुण्यात पोहचले. तेथील शासकीय वाहनाने सकाळी मुळगावी येरवळेत ते आणले. कुटूंबीयाचा आक्रोश ह्रदय पिळवटणारा होता. जवान सुरज यांचा 11 महिन्याच्या कृष्णांश या बाळाला पाहून अनेकांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या.

कोयना नदीच्या काठावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात चुलते सुनिल यादव व 11 महिन्यांचा मुलगा महिन्याचा मुलगा कृष्णांश यांनी भडाग्नी दिला. तत्पुर्वी 24 मराठा लाईट इन्फट्रींच्या जवानांनी हवेत फेरी झाडून मानवंदना दिली. सातारा पोलीस विभागाने सलामी यावेळी दिली. कॅप्टन सुजितसिंह कुमार सहाय्यक कॅप्टन एस. इ. बाबर, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी मीनाताई साळुंखे, एपीआय संदीप मोरे, मनोहर शिंदे, अशोकराव पाटील पोतलेकर, अॅड आनंदराव पाटील, माजी पंचायत समिती सदस्या नंदाताई यादव, सरपंच रूपाली यादव यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दाजंली वाहिली. सातारा फाऊंडेशनचे माजी सैनिक अणि गावच्या तरूणांना विशेष परिश्रम यावेळी घेतले.