
‘महाराष्ट्र श्री’ राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी राज्यभरातील दमदार आणि जोरदार शरीरसौष्ठवपटूंनी दंड थोपटले आहेत. अनेक दिग्गज खेळाडू आपल्या सुपर फॉर्मात असल्यामुळे शुक्रवारपासून सुरू होणाऱया ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेत किताबासाठी काँटे की टक्कर होणार असल्याची शक्यता महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष प्रशांत आपटे यांनी वर्तवली आहे. ‘महाराष्ट्र श्री’ जिंकण्याचा षटकार ठोकणारा सुनीत जाधव या वर्षापासून आयकर खात्याकडून खेळणार असल्यामुळे त्याची जेतेपदाची मालिका यंदा खंडित होणार आहे. त्यामुळे यंदा राज्याला नवा ‘महाराष्ट्र श्री’ मिळणार असल्याचे निश्चित झाले असून जबरदस्त तयारीत असलेला अनिल बिलावा, महेंद्र चव्हाण, महेंद्र जाधव, ‘मुंबई श्री’ रसल दिब्रिटो, सुशील मुरकर, भास्कर कांबळे, नीलेश दगडे यांच्यात ‘महाराष्ट्र श्री’साठी सातारच्या तालीम संघ मैदानात जोरदार संघर्ष पाहायला मिळेल यात तीळमात्र शंका नाही.
बिलावा, महेंद्र चव्हाणवर नजरा
सुनीत जाधव नुकताच आयकर खात्यात रुजू झाला असल्यामुळे त्याला नियमानुसार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. त्यामुळे त्याला ‘महाराष्ट्र श्री’ स्पर्धेतही खेळता येणार नाही. आजवर प्रत्येक स्पर्धेत जेतेपद आणि किमान सुवर्ण जिंकणारा मुंबईकर अनिल बिलावा ‘महाराष्ट्र श्री’चा दावेदार आहे. त्याची अभूतपूर्व तयारी पाहता त्याला महेंद्र चव्हाण, महेंद्र जाधव, रसल दिब्रिटो रोखण्यात किती यशस्वी ठरतील याबाबत साशंकता आहे.




























































