
सातारा येथील पेढे व्यावसायिकाला गेल्या आठ दिवसांपासून इंटरनॅशनल कॉल येत असून, 30 लाख रुपयांची खंडणी न दिल्यास बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलीस मुख्यालयात तक्रार अर्ज देण्यात आला आहे.
प्रशांत मोदी असे तक्रार अर्ज केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांना इंटरनॅशनल कॉल येत आहेत. ‘30 लाख रुपये दे, अन्यथा बॉम्ब लावून उडवून देईन’, अशी धमकी देण्यात आली. सुरुवातीला मोदी यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यांना रात्री-अपरात्रीदेखील फोन येण्याचे तसेच मेसेज करून वारंवार 30 लाख रुपये देण्यासाठी धमकावले गेले. सुमारे 10 ते 12 कॉल, मेसेज आल्याने मोदी यांनी पोलीस मुख्यालयात याबाबत ई-मेल करून तक्रार अर्ज पाठवला. या तक्रार अर्जात आलेले फोन नंबर, मेसेज याचे स्क्रीनशॉटही जोडले आहेत.
या धमकीमुळे जीविताला धोका निर्माण झाला आहे. दोन वेगवेगळ्या नंबरवरून एकाच प्रकारची धमकी दिली जात असल्याचे मोदी यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे. सातारा पोलिसांना मेल पाठविल्यानंतर प्रशांत मोदी यांनी सायबर पोलीस ठाण्यात जाऊन घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सातारा पोलिसांनी सर्व बाजुंनी तपासाला सुरुवात केली आहे.




























































