
सातारा जिह्यातील फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. बदने स्वतः फलटण ग्रामीण पोलिसांसमोर हजर झाला.तर दुसरा आरोपी प्रशांत बनकर यालाही पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले आहे.
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवून केली आहे. निवासी डॉक्टरांची असलेल्या केंद्रीय मार्ड आणि मुंबई पालिकेच्या रुग्णालयातील ‘बीएमसी मार्ड’ने तीव्र निषेध केला आहे. सर्व वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी काळ्या फिती बांधून निषेध केला. या प्रकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा ‘मार्ड’ने दिला आहे.
एमडी होण्याचे स्वप्न भंगले… शैक्षणिक कर्जही फिटले नाही
पोलीस अधिकाऱ्याच्या मानसिक छळाला कंटाळून फलटण येथे आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरवर कोठरबन येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉक्टर होण्यासाठी काढलेले शैक्षणिक कर्जही फिटले नाही आणि एमडी होण्याचे तिचे स्वप्नही अधुरेच राहिले, अशी खंत तिच्या नातलगांनी व्यक्त केली. फलटणमध्ये आलेले अनुभवही अतिशय विचित्र होते, समाजात माणुसकी शिल्लक राहिली नाही, अशी भावनाही नातलगांनी व्यक्त केली.
निंबाळकरांना सहआरोपी करा, अंबादास दानवे यांची मागणी
फलटण येथील महिला डॉक्टरने भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजकीय दबाव आणल्याचा आरोप केला होता. या दबावामुळे डॉक्टर तरुणीने आत्महत्या केल्याचे सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे. त्यामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सहआरोपी करण्याची मागणी शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने ऐन दिवाळीत गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. आत्महत्येपूर्वीच्या तळहातावर लिहिलेल्या सुसाईट नोटमध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने याने चार वेळा बलात्कार केल्याचा आणि त्याचा सहकारी प्रशांत बनकरने मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन या केसमध्ये सत्तेचा दुरुपयोग व राजकीय दबाव वाढण्याची भीती व्यक्त केली.




























































