
पुढील वर्षी होणाऱ्या 100व्या साहित्य संमेलनासाठी यंदाचे साताऱ्यातील साहित्य संमेलन पथदर्शी ठरावे, अशा पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन करावे लागेल. केवळ गर्दी जमवून चालणार नाही, तर इंग्रजी वाचकांना मराठीच्या मांडवात आणावे लागेल, त्याकरिता पुढील 100 दिवसांत सातत्याने लोकजागर करावा लागणार असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा व मावळा फाऊंडेशनच्या वतीने न्यू इंग्लिश स्कूलच्या सभागृहात 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हांचे अनावरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मसापचे प्रतिनिधी रवींद्र बेडकिहाळ, किशोर बेडकिहाळ, डॉ. राजेंद्र माने, डॉ. अजिंक्य सगरे, शिरीष चिटणीस आदी उपस्थित होते. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ‘मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी सातारा जिह्याने केलेल्या चळवळी या राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामुळे सातारकर साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडतील, अशी मला खात्री आहे.’
बोधचिन्हाचे असे रूप
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनी अत्यंत सुरेख व चातुर्याने बनविले आहे. तलवारीच्या दुसऱ्या टोकाला त्यांनी पेनाची रचना केल्याने ते आकर्षक दिसत आहे.