साताऱयात तीन दिवसांपासून लसीकरण ठप्प, केंद्रावर बंदचे फलक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सातारा जिल्ह्याला गेल्या तीन दिवसांपासून लसींचे डोस उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहीम मंदावली आहे. सातारा, कराड, फलटण, वाई, कोरेगाव या शहरांत ऑनलाइन नोंदणीनुसार लसीकरण सुरू आहे. मात्र, लसच उपलब्ध नसल्याने ऑनलाइनही नोंदणी होत नाही. याचबरोबर लसीसंदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध होत नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश केंद्रावर लसीकरण बंदचे फलक लागल्याचेही दिसून येत आहे.

सातारा जिह्यात लसीकरणाची मोहीम 16 जानेवारीपासून सुरू झाली. सुरुवातीला लसीचे डोस मोठय़ा संख्येने उपलब्ध झाल्याने एकाच दिवसात 50 हजारांहून अधिक लसीकरण झाले होते. मागील महिनाभरापासून लसींचे डोस मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाल्याने मोहीम वेगाने सुरू होती. मात्र, तीन दिवसांपासून जिह्याला लसच उपलब्ध न झाल्याने लसीकरण मोहीम काहीशी मंदावली आहे. याचबरोबर, लसीकरण केंद्रावरील गोंधळ टाळण्यासाठी सातारा, कराड, फलटण, वाई, कोरेगाव या शहरांत ऑनलाइन नोंदणी करणाऱयांनाच लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून जिह्याला लसच उपलब्ध न झाल्याने केंद्रांवर लसीकरण बंदचे फलक लागले आहेत.

दरम्यान, जिह्यात आतापर्यंत 15 लाख 35 हजार 685 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामधील पहिला डोस 10 लाख 9 हजार, तर दुसरा डोस 4 लाख 65 हजार नागरिकांनी घेतला आहे. गेल्या तीन दिवसांपासून लस उपलब्ध झाली नाही. मात्र, येत्या काही दिवसांत जास्तीत जास्त लसीचा पुरवठा करून लसीकरण मोहिमेचा वेग वाढविणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

लसीकरणाशिवाय विक्रेत्यांना आठवडी बाजारात ‘नो एण्ट्री’

आठवडी बाजारामध्ये आता खरेदीसाठी गर्दी होत असल्याने बाजारात येणाऱया विक्रेत्यांना लसीकरणाशिवाय नो एण्ट्री करण्यासाठीचा निर्णय प्रत्येक गावात होताना दिसतो आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी गावांनी हा स्तुत्य निर्णय घेतला आहे. जिह्यामध्ये विविध आठवडी बाजारांमध्ये रामभरोसे स्थिती आहे. बाजारात मोठय़ा प्रमाणामध्ये गर्दी होत आहे. कोरोनाच्या प्रसारासाठी ही गर्दी कारणीभूत ठरू शकते, ही भीती आहे. पाटण तालुक्यातील ढेबेवाडी ग्रामपंचायतीने लसींचे दोन डोस घेतल्याशिवाय विक्रेत्याला बाजारात प्रवेशबंदी केलेली आहे. दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र बघितल्याशिवाय त्यांना बाजारात प्रवेश दिला जात नाही. हीच भूमिका अनेक गावांमध्ये घेतली जात आहे.