साताऱ्यातून लाखोंचे सोने-चांदी लुटणारे दरोडेखोर यवतमध्ये जेरबंद, पाचजण अटकेत

कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने कुरियर घेऊन जाणाऱया पिकअप गाडीवर सिनेस्टाइल दरोडा टाकून सोन्या-चांदीच्या विटा लुटल्याची घटना पुणे-बंगळुरू महामार्गावर साताऱयातील काशीळ गावाजवळ शनिवारी मध्यरात्रीनंतर घडली होती. यानंतर पसार झालेल्या पाच दरोडेखोरांना यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. पुणे-सोलापूर महामार्गावर कासुर्डी टोलनाका येथे रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. दरोडेखोरांकडून 18 किलो चांदी, 79.54 ग्रॅम सोन्याचे दागिने, गुह्यात वापरलेली इनोव्हा गाडी, छऱयांचे पिस्तूल असा तब्बल 24 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सर्फराज सलीम नदाफ (वय 34), मारुती लक्ष्मण मिसाळ (वय 31, दोघे रा. हातकणंगले), सूरज बाजीराव कांबळे (वय 24), करण सयाजी कांबळे (वय 23), गौरव सुनील घाडगे (वय 23) अशी अटक करण्यात आलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. त्यांच्या दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत सातारा जिह्यातील बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

साताऱयात लूट केलेले दरोडेखोर सोलापूर रस्त्याने जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर यवत पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोलापूर महामार्गावरील कासुर्डी टोलनाका परिसरात सापळा लावला. इनोव्हा गाडी आल्यानंतर त्यांना थांबविले असता, दरोडेखोर शेजारच्या उसाच्या शेतामध्ये पळून गेले. पोलिसांनी पाठलाग करून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या विटा, इनोव्हा कार असा तब्बल 24 लाख 72 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे सातारा व पुणे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे, केशव वाबळे, कर्मचारी राजीव शिंदे, गणेश कर्चे, रवींद्र गोसावी, संदीप देवकर, सचिन घाडगे, विजय कांचन, नूतन जाधव आदींनी ही कारवाई केली.

फिल्मी स्टाईलने पाठलाग

कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेली पिकअप गाडी मध्यरात्री अडीचच्या सुमारास सातारा ते कराड यादरम्यान काशीळ येथे पोहोचली. या पिकअपच्या पाळतीवर असलेल्या दरोडेखोरांनी दुसऱया वाहनातून थरारक पाठलाग सुरू केला. काशीळ पुलावर दरोडेखोरांनी पिकअप रोखली. चालक व अन्य व्यक्तींवर गुंगीचा प्रे फवारून त्यांनी गाडीचा ताबा घेतला. गाडीतील लोकांना तेथेच सोडून आरोपी पिकअपसह फरार झाले. अतित गावाजवळ समर्थनगर येथे गाडीतील सोन्या-चांदीच्या विटा चोरून पिकअप तेथेच सोडून दरोडेखोर पसार झाले होते. चित्रपटातील थरारक पाठलागाचा प्रसंग शोभावा असे हे थरारनाटय़ घडले.