परीक्षण – अव्यक्त घुसमटीचा मौनदाह

>> सतीश चाफेकर

प्रवीण दवणे यांनी आतापर्यंत 120 च्या वर पुस्तके लिहिली. त्यात कथा, लेख, कविता यांची पुस्तके आहेच. असंख्य गीते, चित्रपट गीते त्यांनी लिहिली. सुमारे 12 काव्यसंग्रह प्रकाशित झाले.

नुकताच त्यांचा ‘मौनदाह’ हा काव्यसंग्रह  ‘शब्दमल्हार’ प्रकाशनाने प्रकाशित केला. त्यात वेगळे प्रवीण दवणे दिसले.

सुरुवातीलाच दोन ओळींनी लक्ष वेधले…

शब्द शोधायला घुमे, खोल मौनातला कोंब!

त्यांच्या कवितेतून निश्चित हा त्यांच्या आयुष्यातला वेगळा भाग, कोपरा या पुस्तकातील कवितांमधून दिसला. त्या कविता इतक्या विलक्षण आहेत की, त्या वाचता वाचता वेगळे प्रवीण दवणे दिसतात, त्यांची वेगळी ओळख होते म्हणण्यापेक्षा एका लेखकाच्या, कवीच्या आतल्या मनातले कवडसे,  त्यातील मौन वेदना,  संवेदना दिसून येतात. त्यांनी अनेक तीव्र चढ-उतार बघितले आहेत. त्याचे प्रतिबिंब या ‘मौनदाह’ काव्यसंग्रहामध्ये पडलेले जाणवते.

जगणे असेच असते. जोपर्यंत श्वास आहे, तोपर्यंत प्रवास हा असतोच, परंतु त्या प्रवासात काय मिळते हे सांगणे कठीण. यश, अपयश यांची पूर्तता होते आणि लगेच दुसरी आव्हाने उभी राहतात असे निदान वाचक म्हणून मला वाटते. कदाचित प्रवीण दवणे यांना वेगळा अर्थ अभिप्रेत असेल.

या काव्यसंग्रहाचे कुठलेही पान उघडा आणि वाचण्यास सुरुवात करा. तुम्हाला त्या कवितेचे, त्या कडव्याचे, त्या दोन ओळींतील, त्या दोन शब्दांमध्येदेखील अर्थ दडला असून  प्रत्येकाने आपापल्या वैचारिक पातळीवर, अनुभवावर किंवा अनुभूतीवर काय तो समजून घ्यावा लागेल, तुम्हाला त्या कवीच्या भूमिकेत जाऊन अर्थ शोधावा लागेल. कारण या नुसत्या कविता नाहीत, तर एक जगणं, एक सोसणं आहे याची खात्री पटेल. फक्त तुम्हाला त्या वैचारिक पातळीवर जावे लागेल.

मानवी मन कधी एकाकी असते तर जंगलात एकटेच फिरत असते. आता हे जंगल मानवी आहे की खरेखुरे जंगल आहे? अर्थात या जंगलात श्वापदे आहेतच, पण सतत भूक लागणारी श्वापदे मानवी जंगलातच आहेत. नुसत्या खऱया जंगलातील श्वापदे भूक लागल्यावर शिकार करतात.

मानवी विचार आणि शब्द आजकाल तोलूनमोलून वापरावे लागतात. नाहीतर काय होते हे सर्वांना माहीत आहे. शब्दाच्या आहारी न जाता कमीत कमी शब्दांत भेदकपणे प्रवीण दवणे यांनी कवितेत सांगितले आहे.

कवी म्हणा, लेखक म्हणा किंवा कुठलाही कलाकार किंवा कलाकृती निर्माण करणारा म्हणा, त्याला  सहज यश मिळालेले नसते. त्याला त्यासाठी बरेच काही म्हणजे खूप काही द्यावे लागते आणि एखाद्या क्षणी तो अपमान, ती अवेहलना, विश्वासघातकी घाव त्याच्या आयुष्यावर, नाही म्हटले तरी त्याला जखमी करून जातात. अर्थात तो त्याचे काम करत असतो किंवा कधी कधी कोलमडून पडतो.

पण प्रवीण दवणे यांनी इतके मानापमान, आघात सोसून मुसंडी मारली आहे.

पण एक क्षण असा येतो की हे अपमान, आघात माणसाला निबीड अरण्यात घेऊन जातात आणि त्या अरण्यातील वास्तव्यात मात्र त्याच्या शब्दांना भाले म्हणता येणार नाही, पण त्या शब्दांना विलक्षण धार येते. अर्थात त्या शब्दाची धार त्या कवीला समजते आणि त्याच जंगलातून जो जातो त्याला जाणवते.

प्रवीण दवणे हे कितीही हसरा चेहरा ठेवत असतील, पण  सर्व दुःख सोसून, सकारात्मक दृष्टिकोन सतत असल्यामुळे ते आज वादळातही उभे आहेत. या इथे त्यांचा  ‘मौनदाह’ हा काव्यसंग्रह मात्र त्यांच्या आतल्या मनाचा वेध घेतो.

ते त्यांच्या कवितेत म्हणतात…

आता मला ते कुणीच नको आहेत

माझ्या मालकीच्या ह्या

स्वतंत्र अरण्य अंधारात !

पण तेच आता जवळ येत आहेत,

चाल केल्यासारखे.

असहाय समजून

पुढे करीत आहेत खांदा,

त्यांना बजावत आहे,

प्रत्येक वृक्ष,

माझ्या चितेतूनही

भाले उगवू शकतात.

या ओळी वाचल्यावर मानवी भयानक वृत्तीचे वास्तव कळून येते. आज हे वास्तव आपण जागोजागी अनुभवत आहोत, पण ते प्रवीण दवणे यांनी सांगताना आपला राग, त्वेष परखडपणे, समर्थपणे दाखवून दिले आहे.

आता याच ओळी बघा ना! एक सत्य सांगून त्यांनी दाखवून दिले आहे. अशी कविता कवी वाचतो किंवा लिहितो तेव्हा जी दाद नेमकी कशाला असते हे माझ्यासारख्या सामान्य वाचकाला गोंधळवून टाकते.  हा राग, मानवी मन विदीर्ण करणारे अनुभव जेव्हा कवी शब्दांतून मांडतो तेव्हा त्याला दुःख वाटते की आनंद होतो याचा दाद देणाऱयांनी कधी विचार केला आहे का?

ते आपल्या कवितेत म्हणतात…

रडण्याचेही स्वातंत्र्य नसलेल्या

ह्या अरण्य प्रदेशात मी उभा आहे

नवा मुखवटा चढवीत,

तर तू म्हणालीस,

‘व्वा ही कविता छान आहे !’

खरेच या अशा कवितांना दाद ही मौनातूनच द्यावी लागणार आणि अशीच दाद द्यावीशी वाटते, तीही अगदी निशब्द. आपण जेव्हा एक-एक कविता अनुभवाल तेव्हाच हे तुम्हालाही कळेल.

मौनदाह

कवी : प्रवीण दवणे

प्रकाशक : शब्दमल्हार प्रकाशन  

पृष्ठे : 100 रुपये, मूल्य : 200 रुपये