प्रदूषणाचा धोका आणि जैवविविधतेचा नाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>सतीश फाटक<<

[email protected]

 झपाटय़ाने होणाऱया वातावरणातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत पाचवेळा मोठय़ा प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे.   जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळूहळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा नाश होत आहे.

‘पर्यावरण’ या शब्दाच्या व्याख्येनुसार सजीवांच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. वैज्ञानिक परिभाषिक कोशानुसार पर्यावरण या संज्ञेत वनस्पती अथवा प्राणी ज्या नैसर्गिक परिसरात जगतात, वाढतात तेथील हवा, जमीन, पाणी, इतर सजीव, पर्जन्यमान, उंची, तापमान इत्यादी सर्वांचा समावेश होतो. मराठी विश्वकोशातील व्याख्येनुसार विशिष्ट वेळचे पर्यावरण म्हणजे शिलावरण, जलावरण, जीवावरण व वातावरण या मुख्य भूवैज्ञानिक घटकांतील सतत चालू असणाऱया प्रक्रिया व आंतरक्रिया यांचा परिणाम होय. मराठी विश्वकोशानुसार सर्व सजीव व पर्यावरण एकात्मपणे परस्पराश्रयी असतात.

सजीवांना त्यांच्या जीवन संघर्षासाठी आणि उक्रांतीमध्ये सभोवतालच्या पर्यावरणाशी जुळवून घ्यावे लागते अथवा अनुकूल असे बदल करावे लागतात. जे सजीव आपल्यात बदल घडवून आणण्यात कमी पडतात किंवा काही कारणास्तव ते स्वतःमध्ये बदल घडवू शकत नाही त्यांना आपल्या प्राणास मुकावे लागते. कारण जो बदल स्वीकारतो तोच येथे तग धरून राहू शकतो. पर्यावरण आणि मानव यांचे परस्परसंबंध नेहमी बदलत असतात आणि मनुष्यप्राणी मुळातच बुद्धिमान असल्यामुळे हे रक्षण करणे सर्वांची जबाबदारी, किंबहुना कर्तव्य आहे. पर्यावरण संरक्षण प्रत्येकाची जबाबदारी आहे.

जैवविविधता म्हणजे सजीवांमधील एखाद्या जाती, परिसंस्था, बायोम, किंवा पूर्ण पृथ्वीवरील विविधता. परिसंस्थेमधील विविधता हे परिसंस्थेच्या निकोपपणाचे एकक आहे. जैवविविधता बऱयाच प्रमाणात भूभागाच्या हवामानावर अवलंबून असते. उदाहरणार्थ उष्ण प्रदेशीय भागामध्ये जैवविविधता अधिक तर ध्रुवीय भागामध्ये विविधता कमी असते.

झपाटय़ाने होणाऱया वातावरणातील बदलांमुळे सजीव सामूहिकरीत्या लुप्त होतात. एका अंदाजानुसार पृथ्वीवर असलेल्या एकूण सजीवांपैकी एक टक्का सजीव लुप्त झाले आहेत. सजीवांची पृथ्वीवर निर्मिती झाल्यापासून आजपर्यंत पाचवेळा मोठय़ा प्रमाणात आणि अनेक वेळा लहान प्रमाणात जैवविविधतेचा नाश झाला आहे.

जैवविविधतेमध्ये माणसाचा प्रवेश झाल्यानंतर जैवविविधता आणि जनुकीय विविधता हळूहळू नाहीशी होत आहे. यास ‘हॉलोसिन विनाश’ असे म्हटले जाते. मानवी हस्तक्षेपामुळे अधिवास नष्ट झाल्याने जैवविविधतेचा नाश होत आहे. संयुक्त राष्ट्र संघाने जैवविविधतेच्या नाशाकडे लक्ष देण्यासाठी हे दशक जैवविविधता दशक म्हणून जाहीर केले आहे.

जैवविविधता पृथ्वीवर समप्रमाणात पसरलेली नाही. पृथ्वीवरील जैवविविधतेमध्ये विस्ताराची विविधता आढळतेच. एवढेच नव्हे तर एकाच प्रदेशामध्येसुद्धा सारखेपणा आढळून येत नाही. सजीवांमधील विविधता तापमानावर, पडणाऱया पावसाच्या प्रमाणावर, समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर, भूप्रदेशाच्या गुणधर्मावर आणि सभोवती असलेल्या इतर सजीवांच्या अस्तित्वावर अवलंबून असते.

विषुववृत्ताजवळील उष्ण प्रदेशामध्ये विविधता अधिक तर ध्रुवीय प्रदेशामध्ये कमी विविधता आढळते. ‘आययूसीएन’ या संस्थेने दुर्मिळ किंवा अस्तित्व धोक्यात आल्याचे जाहीर केलेल्या सजीवांची संख्या ४० हजार १७७ एवढी होती. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार अशा जातींची संख्या दहा लाखांवर पोहोचेल. भूप्रदेशावरील विविधता महासागरी विविधतेपेक्षा पंचवीस पटींनी अधिक आहे.

प्रदूषण अनेक प्रकारचे असते. यामध्ये मृदा प्रदूषण, जलप्रदूषण, वायुप्रदूषण इत्यादींचा समावेश होतो. हवेत किंवा अन्नात सजीवांना हानीकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला प्रदूषण म्हणतात. प्रदूषण म्हणजे जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणे.

सध्या पाणी प्रदूषण हा एक गंभीर प्रश्न समाजासमोर आहे आणि त्यापेक्षा गंभीर परिस्थिती ही सांडपाणी प्रदूषणाची आहे. त्यामुळे मातीत असलेली सुपीकता कमी होते आणि त्यात विषारी पदार्थ मिसळले जातात.

जगात दरवर्षी प्रदूषणामुळे एक कोटीहून अधिक मृत्यू होतात. हवा, माती, डोंगरदऱया, जंगल, त्यातील प्राणी वनस्पती, सूक्ष्म जीव, कीटक याशिवाय वाळवंट, बर्फाने आच्छादलेली शिखरे, समुद्र, नद्या, त्यातील सर्व प्रकारचे जीव हे सर्व पर्यावरणाशी संबंधित घटक आहेत, तर गर्दीने खचाखच भरलेली शहरे, कारखान्यांमुळे होणारे प्रदूषण, वाहनांची वाढती संख्या, कर्णकर्कश हॉर्न यामुळे होणारे हवेचे प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा ऱहास होत आहे.

सांडपाणी सोडणे, आण्विक कचरा सागरतळाशी सोडणे जमिनीत शेतीसाठी रासायनिक खतांचा अतिवापर तसेच कचरा पुरणे, कचऱयावर प्रक्रिया न करता  धूर व औद्योगिक वायू सोडणे, जास्त प्रमाणात प्रदूषण पसरवणारी वाहने  हे सर्व घटक प्रदूषणाचा धोका वाढवीत आहेत. जुन्या व वापरलेल्या बॅटरीज्चे नियमन आणि त्यांचा फेरवापर पर्यावरणाला साजेसा होण्यासाठी पर्यावरण संरक्षण कायदा  १९८६ च्या तरतुदीखाली हिंदुस्थान सरकारने शिशाच्या आम्लयुक्त बॅटरीचे व्यवस्थापन व हाताळण्यासाठीचे  नियम १०१४ मध्ये प्रसिद्ध केले आहेत. तेव्हा प्रदूषण टाळण्यासाठी प्रशासनावर कडक भूमिका घ्यायलाच हवी, पण नागरिकांनीही जागरुकता दाखवणे आवश्यक आहे.

वाढत्या प्रदूषणामुळे लहान मुलांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे. तसेच त्यांच्या आरोग्याला हानीकारक असे वातावरण निर्माण होत आहे. लोकांचे जीवनमान धोक्यात आले आहेत. स्वच्छ असा ऑक्सिजन मिळत नाही. सर्वांनी वेळीच दक्षता घेतली नाही तर विनाश अटळ आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांचा सहभाग अत्यावश्यक आहे.

(लेखक पर्यावरणप्रेमी आणि अभ्यासक आहेत.)