सत्यपाल मलिक यांचे निधन

सरकारच्या जाचक कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनाला उघड पाठिंबा देणारे आणि पुलवामा हल्ल्यावरून गंभीर आरोप करून मोदी सरकारला घाम पह्डणारे जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे आज निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या मलिक यांच्यावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

उत्तर प्रदेशातील प्रभावी जाट नेते असलेल्या सत्यपाल मलिक यांनी विद्यार्थी नेते म्हणून राजकीय जीवनास सुरुवात केली. 1974 साली भारतीय क्रांती दलातून ते आमदार म्हणून निवडून आले. राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य म्हणूनही काम केले.

जनता दल, काँग्रेस, लोकदल, समाजवादी पक्ष आणि शेवटी भाजप अशा सर्वच पक्षांचा प्रवास त्यांनी केला. भाजपने त्यांना राज्यपाल पद दिले. सुरुवातीला बिहार, ओडिशा, जम्मू-कश्मीर, गोवा, मेघालय या राज्यांचे राज्यपाल पद त्यांनी भूषवले. गेल्या काही वर्षांपासून ते सातत्याने चर्चेत होते. कृषी कायद्यांच्या विरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनाला त्यांनी ठाम पाठिंबा दिला होता. मोदी सरकारवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते.

शेवटची पोस्ट व्हायरल

रुग्णालयात आजाराशी झुंजत असताना मलिक यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट केली होती. ती त्यांची शेवटची पोस्ट ठरली. त्यात ते म्हणाले होते, ‘परवा मी बरा होतो, आज पुन्हा आयसीयूमध्ये आणलंय. माझी तब्येत बिघडत चाललीय. मी असेन किंवा नसेन, पण माझ्या देशवासीयांना सत्य सांगून जायचे आहे.’ त्यांची ही पोस्ट आता व्हायरल होत आहे.

मलिक यांनी मोदी सरकारला दिलेले हादरे

  • शेतकऱ्यांचे आंदोलन मोदी सरकारने चुकीच्या पद्धतीने हाताळले. शेतकऱयांना अपमानित करणे चुकीचे आहे. आंदोलनादरम्यान 600 लोक मरूनही सरकार शांत कसे, असे म्हणत मलिक यांनी सरकारवर तोफ डागली होती.
  • 2023 मध्ये मलिक यांनी दिलेली एक मुलाखत सरकारला हादरवणारी ठरली. पुलवामातील दहशतवादी हल्ला हे गुप्तचर विभागाचे अपयश होते. सीआरपीएफने पेंद्रीय गृह मंत्रालयाकडे विमानाची मागणी केली होती, मात्र ती फेटाळली गेली. यावर काहीही बोलू नका अशा सूचना पंतप्रधान मोदी व अजित डोवाल यांनी मला दिल्या होत्या, असा आरोप त्यांनी केला होता.
  • जम्मू-कश्मीरमधील किरू हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टच्या मुद्दय़ावरून मलिक यांनी मोदी सरकारला घेरले होते. या प्रकल्पाला परवानगी देण्यासाठी मला 300 कोटींची लाच देण्यात आली होती. ही माहिती पंतप्रधानांना दिली होती, मात्र नंतर माझी बदली करण्यात आली. त्यानंतर प्रकल्पाच्या फाइल क्लिअर करण्यात आल्या, असा आरोप त्यांनी केला होता.

पंतप्रधानांसह मान्यवरांची श्रद्धांजली

पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘एक्स’ पोस्ट करून मलिक यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी लढवय्या म्हणत मलिक यांना श्रद्धांजली वाहिली. ‘सत्यपाल मलिक यांनी कुठलीही भीती न बाळगता नेहमी सत्याची बाजू मांडली, वेळप्रसंगी रोषही पत्करला, पण ते मागे हटले नाहीत,’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.