हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे एकत्व आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण – सात्यकी सावरकर

‘हिंदुत्व म्हणजे हिंदूंचे एकत्व आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण होय,’ असे प्रतिपादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी येथे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘जयोस्तुते’ हे जे स्वातंत्र्यगीत लिहिले आहे, त्यात ‘हे अधम रक्तरंजिते’ म्हटले आहे. म्हणजे अधमाचे रक्त सांडून ही स्वतंत्रता मिळाली आहे. याचे स्मरण होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

चिंचवडगावातील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान’तर्फे सिल्व्हर गार्डन येथे गणेशोत्सवानिमित्त सात्यकी सावरकर यांचे व्याख्यान व त्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सातुर्डेकर यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्ष शमीम पठाण, अश्विनी चिंचवडे, मोरेश्वर शेडगे, सुरेश भोईर, योगेश चिंचवडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कलशेट्टी, मीना पोकर्णा, अभय पोकर्णा आदीउपस्थित होते.

सावरकर म्हणाले, ‘समान रक्त, समान संस्कृती, समान इतिहास या निकषाच्या आधारे आपण सारे एकमेकांचे हिंदू बंधू आहोत, हा विचार महत्त्वाचा आहे. देशात विशिष्ट समाजाचे लांगूलचालन अयोग्य आहे.’ मीना पोकर्णा यांनी स्वागत केले. ईशा दुमणे व जया सेठ यांनी ‘जयस्तुते’ हे स्वातंत्र्यगीत सादर केले. अद्वैत दिवाण यांनी सूत्रसंचालन केले. रुई कोलगीकर यांनी आभार मानले.