मी खरं बोलून लोकांची पापं जगासमोर आणली, म्हणूनच बोलावणं आलं आहे – सत्यपाल मलिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुलवामा हल्ल्याबाबत गौप्यस्फोट करणारे जम्मू कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना शुक्रवारी सीबीआयने समन्स बजावले आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स जनरल इन्श्युरन्समधील घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी सत्यपाल मलिक यांची चौकशी केली जाणार आहे. यावरून सत्यपाल मलिक यांनी ट्विटरवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

”मी खरं बोलून लोकांची पापं जगासमोर आणली आहेत. कदाचित त्यामुळेच मला बोलावलं गेलं आहे. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. घाबरणार नाही. सत्यासोबत कायम उभा राहिन”, असे सत्यपाल मलिक यांनी ट्विट केले आहे. ”सीबीआयने मला हजर राहून त्या प्रकरणातील काही गोष्टी स्पष्ट करण्यास सांगितले आहे. त्यांनी मला तोंडीच याबाबत कळवलं आहे. 27 किंवा 28 एप्रिल या पैकी कधीही माझ्या सोयीने मला हजर राहण्यास सांगितलेले आहे’, असे सत्यपाल मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेला भयंकर हल्ला ही मोदी सरकारची चूकच होती. जवानांना जम्मूहून श्रीनगरला एअरलिफ्ट करण्यासाठी मी विमानांची मागणी केली होती. पण गृहमंत्रालयाने विमाने दिली नाहीत. मोदी सरकारची अकार्यक्षमता आणि हलगर्जीपणामुळे हल्ला झाला आणि जवानांचे प्राण गेले, असा खळबळजनक गौप्यस्फोट जम्मू-कश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी याविषयी कोणाला काही बोलू नका, गप्प बसा असे मला सांगितले होते, अशी माहितीही मलिक यांनी दिली.