
दक्षिण आफ्रिका दौरा आणि 2020पासून फलंदाजीत अपयशी ठरलेले टीम इंडियाचे अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना कसोटी संघातील स्थान टिकवायचे असेल तर त्यांनी रणजी करंडकात चमक दाखवावी, असे अप्रत्यक्ष संकेत हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी या दोन ज्येष्ठ खेळाडूंना दिले आहेत.
टीम इंडियाचे प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा फ्लॉप शो दक्षिण आफ्रिकन दौऱयात कायम राहिला आहे. त्याआधी 2020नंतर या दोन्ही स्टार खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष अशी कामगिरी केलेलीच नाही. त्यांच्या अपयशामुळेच संघाला दक्षिण आफ्रिकन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी गमवावी लागल्याची टीका क्रिकेटरसिक करीत आहेत. या पार्श्वभूमीवर बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी या दोघांना आता रणजी करंडकात तरी आपले अपयश दूर करा अन्यथा कसोटी संघातील तुमचे स्थान डळमळीत होईल, असा इशाराच दिला आहे.
2020नंतर रहाणे, पुजाराचा फ्लॉप शो
रहाणे पुजारा
19 कसोटी 20 कसोटी
819 धावा 973 धावा
112 सर्वोत्तम 91 सर्वोत्तम
24.8 सरासरी 26.29 सरासरी
3 अर्धशतके, 1 शतक 8 अर्धशतके
रणजी स्पर्धेत सूर गवसेल – गांगुली
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपयशाच्या गर्तेत सापडलेले चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे अनुभवी आणि उत्तम क्रिकेटर आहेत. त्यामुळे ते रणजी करंडक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करून पुन्हा आपल्या नैसर्गिक फॉर्ममध्ये येतील, असा विश्वास बीसीसीआय अध्यक्ष गांगुली यांनी व्यक्त केला आहे. कसोटीसाठी पुन्हा स्वतःला सावरायला त्यांना कोणतीही समस्या येणार नाही, असेही मत गांगुली यांनी व्यक्त केले.
रहाणे, पुजारा दोघांनाही धावांची प्रतीक्षा
एक काळ कसोटी गाजवणारे अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा 2021पासून धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहेत. जानेवारी 2021पासून पुजाराने 16 कसोटींत 27.11च्या सरासरीने फक्त 810 धावा नोंदवल्या आहेत. त्यात एकही शतकी खेळी नाही. तर अजिंक्य रहाणेनेही या कालावधीत 19.95च्या सरासरीने जेमतेम 547 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत पुजाराने 6 डावांत 124 तर रहाणेने तेवढय़ाच डावांत फक्त 136 धावांची नोंद केली आहे. या अपयशी वाटचालीमुळेच रहाणेला कसोटी संघाचे उपकर्णधारपदही गमवावे लागले आहे. विशेष म्हणजे रहाणे आणि पुजाराची कसोटी संघातील जागा घेण्यासाठी हनुमा बिहारी आणि मुंबईकर श्रेयस अय्यर हे सज्ज आहेत. त्यामुळेच पुजारा आणि रहाणेपुढे कारकीर्द वाचवण्याचे मोठे आव्हान आता उभे ठाकल्याचे दिसत आहे.




























































