
>> डॉ. रविकिरण गोवेकर
महाराष्ट्र राज्य आजच्या घडीला तरी व्याघ्र संवर्धनात बरेच आघाडीवर आहे. वाघ वाढले आणि या वाढणाऱया संख्येसोबतच त्यांच्या आकसलेल्या अधिवासामुळे व तुटत जाणाऱया भ्रमण मार्गामुळे मानव-व्याघ्र संवर्धनाच्या काही समस्या निर्माण झाल्याने वाघांकडे वेगळ्या नजरेने पाहायची वेळ आली. लोकचळवळीमुळे वाढलेली ही वाघांची संख्या आता पुन्हा मानव-वन्यजीव संघर्षाकडे झुकली आहे.
या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला सिंधुदुर्ग जिह्यातील तिलारी – दोडामार्गाच्या जंगलाला लागून असलेल्या गोव्यातील म्हादेई अभयारण्यात एक वाघीण आणि तिच्या तीन बछडय़ांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक शंका विषबाधेची होती. दुसरी घटना आहे दक्षिण-मध्य महाराष्ट्रातली. यवतमाळ जिह्यातील टिपेश्वर अभयारण्यातील एक अडीच वर्षांचा, तारुण्यात आलेला टी-1 सी-1 नावाचा वाघ तब्बल पंधराशे किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार करून शेकडो गावे, शेती, रस्ते व महामार्ग ओलांडत तो सात महिन्यांत संभाजीनगरमधील अजिंठय़ाच्या डोंगररांगापर्यंत पार गवताळा अभयारण्याच्या सीमेपर्यंत पोहचतोय. तिसरी घटना आहे राळेगाव या फारशा चर्चेत नसलेल्या यवतमाळ जिह्यातील छोटय़ा तालुक्यातील पीकेटी-1 नावाच्या वाघिणीची. आमच्या जिवावर उठली ही वाघीण म्हणून तिचा बंदोबस्त करा म्हणत आंदोलने करणारे गावकरी आणि त्या वाघिणीला मारू नका म्हणून रान उठवणारे काही व्याघ्रप्रेमी यांच्या गलक्यात त्या वाघिणीला गेल्या नोव्हेंबरमध्ये ठार करण्यात आले. या घटनेनंतर वन विभागाचे लोक पुढे कित्येक दिवस बेस कॅम्पला तिच्या दोन पिलांना पकडण्यासाठी थांबून होते. एक दिवस एक गावकरी बेस कॅम्पजवळ आला व त्याने फॉरेस्टवाल्यांना विचारलं ‘अजून काय म्हणून थांबले जी?, त्या वाघिणीला मारलं नव्हं’ आणि गोंधळलेले वन कर्मचारी आणि तो गावकरी एकामेकाकडे पाहत राहिले.
चौथी घटना थोडी जुनी 2009 मधील चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. ताडोबा हा त्यावेळी आजच्याएवढा लोकप्रिय व्याघ्र प्रकल्प नव्हता. ताडोबाच्या दक्षिण बाजूला वाघांच्या भ्रमण मार्गामध्ये लोहाऱयाच्या जंगलात एक कोळशाची खाण होऊ घातली होती, परंतु वाघाच्या अस्तित्वाला या खाणीमुळे होणारा धोका स्थानिक पर्यावरणवादी संघटनांनी ओळखला. त्यांनी सरकारला निवेदने दिली, रॅली काढल्या आणि उपोषणे केली. समाजातील सर्वच घटकांनी यात साथ दिली. शेवटी लोकांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला आणि वाघांच्या जिवावर उठलेला हा प्रकल्प शेवटी रद्द करण्यात आला.
सांगण्यासारखे प्रसंग किस्से आणि घटना पुष्कळ आहेत. लिहिण्यासाठी वाघांचा इतिहास आहे व भूगोलही आहे. हा भूगोल फार व्यापक आहे. यामध्ये बंगालच्या सुंदरबनामधील समुद्रतलाच्या उंचीवर असणारे वाघ असो अथवा कुमाऊ हिमालयातील सुमारे दहा हजार फुटांपेक्षा जास्त उंचीवर वावरणारे पहाडी वाघ असो, तामीळनाडूतील कल्लकड-मुंडनथुराईच्या जंगलातील हिंदुस्थानातील सर्वांत दक्षिणेकडचे पश्चिम घाटातील वाघ असो त्यांचा भूगोल हा तेवढाच अनाकलनीय आहे.
आमचा वाघ कधी गोष्टीतला ‘वाघोबा’ आणि ‘बघीरा’, कधी चित्रपटाला ‘रिचर्ड पार्कर’ झालाय. कधी वाघदेव होऊन वाघजाई, वाघबीळ अशा ठिकाणी जाऊन लोक संस्कृतीत रंगला तर कधी अयप्पाचे, दुर्गेचे वाहन बनून पुराणामध्ये दिसला. वाघाला साहित्यकारांनी शूर आणि लढाऊ म्हणून त्यांच्या प्रतिभेत मुक्तपणे वापरले.जे-महाराज्यांच्या शिकारपार्टीचा तो केंद्रबिंदू ठरला आणि त्यांच्या याच शाही शौकापायी अगदी तो होत्याचा नव्हतादेखील झाला.
हिंदुस्थानप्रमाणे इतर 13 देशांमध्ये वावर असलेल्या या वाघाने फार खडतर इतिहास अनुभवला. मागच्या शतकात जावा, सुमात्रा, मध्य आशिया इत्यादी भागातून आणि अगदी गेल्याच वर्षात व्हिएतनाम व कंबोडियामधून हा वाघ नामशेष झाला. मलेशिया व थायलंडमध्येदेखील त्यांची संख्या कमीच आहे. केवळ रशिया आपला गड राखून आहे आणि नेपाळ, बांगलादेश त्यांचे वाघ चांगल्या प्रकारे सांभाळत आहेत. मात्र यावर सर्वात कडी जर कोणी केली असेल तर ती हिंदुस्थानने. मुख्यतः बेसुमार शिकारीमुळे त्यावेळी लुप्तप्राय होऊ घातलेल्या वाघाला 1973 च्या ‘प्रोजेक्ट टायगर’ या प्रकल्पाद्वारे राजकीय इच्छाशक्ती दाखवत नामशेष होण्यापासून बचावण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यावेळी नऊ व्याघ्र प्रकल्पापासून सुरुवात करण्यात आली. विविध चढउतार पाहत या प्रोजेक्ट टायगरने गेल्या 45 वर्षांत खूप यश प्राप्त केले. देशातील सुमारे 17-18 राज्यामध्ये आजच्या घडीला एकूण पन्नास व्याघ्र प्रकल्पामध्ये व त्या बाहेर सुमारे तीन हजार वाघांचा वावर आहे. जगातील जंगलामध्ये मुक्तपणे फिरणाऱया वाघांच्या एकूण संख्येच्या सुमारे 70 टक्के वाघ हिंदुस्थानमध्ये आहेत. या यशात प्रोजेक्ट टायगरचा, हिंदुस्थानातील कडक वाटणाऱया वन्यजीव कायद्यांचा, केंद्र ब राज्य सरकारांच्या धोरणांचा, अतिदुर्गम भागात पसरलेल्या जंगलामध्ये काम करणाऱया हजारो वन कर्मचाऱयांचा आणि साथीला सर्वसामान्य जनता, संशोधन संस्था, प्रसार माध्यमे, न्यायालये आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वाघांच्या क्षेत्राजवळ बरेवाईट अनुभव घेत राहणाऱया गावकऱयांचा मोलाचा वाटा आहे.
महाराष्ट्र राज्य आजच्या घडीला व्याघ्र संवर्धनात बरेच आघाडीवर आहे. गेल्या 12 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये वाघांची संख्या दोनशे पेक्षा जास्त टक्क्यांनी वाढली. महाराष्ट्राने आंतरराज्यीय व आंतरराष्ट्रीय शिकार टोळ्यांना नेस्तनाबूत केले, वन्य जीव संवर्धनाकरिता पुरेसा निधी उपलब्ध करुन दिला. व्याघ्र प्रकल्प ऐच्छिक पद्धतीने मानवविरहित करण्याकरिता अत्यंत चांगले पुनर्वसन धोरण, मानव-वन्य प्राणी संघर्षातून झालेल्या नुकसान भरपाईकरिता सर्वांत चांगले पॅकेज, वाघ-वन्य प्राणी असलेल्या जंगलानजीकच्या गावातील ग्रामीणांकरिता पर्यावरण विकासाच्या रूपाने मदत करून जंगलावरचा भार कमी करण्याचा प्रयत्न करणे व लोकांचा व्याघ्र संवर्धनात सहभाग वाढविण्याकरिता, व्याघ्र क्षेत्राचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करणे आणि भविष्यातील नियोजनाकरिता चांगले संशोधन प्रकल्प राबवणे व विशेषतः अत्यंत दुरगामी ठरणारे धोरणात्मक निर्णय घेणे या महाराष्ट्राच्या खूप जमेच्या बाजू आहेत.
देशाने आणि राज्याने प्रयत्न केले. वाघ वाढले आणि या वाढणाऱया संख्येसोबतच त्यांच्या आकसलेल्या अधिवासामुळे व तुटत जाणाऱया भ्रमण मार्गामुळे मानव-व्याघ्र संवर्धनाच्या काही समस्या निर्माण झाल्याने वाघांकडे वेगळ्या नजरेने पाहायची वेळ आली. वाघांनी वाढायचे पण जायचे कुठे हा प्रश्न ऐरणीवर आला. अनेक गावशिवारात, चंद्रपुरातील थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या परिसरात आणि नागपूर शहरातील मिहान सारख्या क्षेत्रात वाघांचा वावर आढळल्याने भविष्यात होणाऱया मानव-वन्य प्राणी संघर्षाची चिंता सर्वांनाच भेडसावू लागली. वाघांसाठी एवढे प्रयत्न करुनही म्हादेई अभयारण्यासारख्या ठिकाणी वाघांची शिकार आजही का होत आहे, याबाबत थोडं मंथन व्हायला हवं.
राळेगावाच्या त्या खेडुताने विचारलेला तो निरागस प्रश्न खरंतर खूप प्रश्नांची उत्तर देणारा आहे. त्याने आपल्याला नकळत सांगून टाकले की, समस्या करणारा वाघ सोडला तर बाकीच्यांची आम्हाला अडचण नाही. चंद्रपूर जिल्हा जिथे वाघासाठी जनतेने आंदोलने केली जो जिल्हा आता सर्वांत जास्त वाघ असलेला हिंदुस्थानातील जिल्हा बनला आणि कर्मधर्म संयोगाने त्याच जिह्यात वाघ व इतर वन्य प्राण्यांमुळे मनुष्यहानी, पशुहानी आणि भयग्रस्तता अशी संघर्षात्मक स्थिती आजच्या घडीला आहे.
या वाघांनी कुणाला रोजगार दिला, कोणाला आधार दिला तर कुणाचा आधार काढूनही घेतला. कुणाला चांगले जंगल देऊन हवा-पाण्याची सोय केली, तर कुणाला नाव मिळवून दिले. वाघ कुणाला हवा आहे तर कुणाला नको आहे. वाघ वाढल्याचा आनंदही आहे आणि वाढत्या वाघांच्या व्यवस्थापनाची चिंतादेखील भेडसावत आहे. वाघ कसाही असो, आवडो किंवा न आवडो, निसर्गामध्ये वाघ वाचायला हवा आणि वाघांची संख्या कमी व्हायला नको हे सत्य आहे, मात्र वाढत्या वाघांसोबत आव्हानेसुद्धा तेवढीच वाढणार आहे हेदेखील कटु सत्य आहे. एवढय़ा वर्षांत या सत्यांचा शोध तर घेऊन झालाय. फक्त प्रश्न आहे की याकडे वस्तुनिष्ठपणे बघताना ती भविष्यामध्ये व्याघ्र संवर्धनाकरिता किती दिशादर्शी ठरतात ते!
(लेखक हे महाराष्ट्र राज्य वन विभागात मुख्य वनसंरक्षक या पदावर असून व्याघ्र व्यवस्थापन क्षेत्रात दीर्घ काळापासून कार्यरत आहेत.)


























































