‘सावित्री’ उलगडणार बिबटय़ांच्या जीवनशैलीचे रहस्य, मुंबईतील बिबटय़ांचा टेलिमेट्रीद्वारे अभ्यास सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लांबसडक शरीरयष्टी, वाऱयाच्या वेगाची चपळाई, भेदक नजर आणि प्रचंड ताकद असलेला बिबटय़ा हा अजूनही रहस्य बनून आहे. मानवी वस्तीपासून जवळ राहूनही सहसा माणसाच्या नजरेस न पडणाऱया बिबटय़ाची जीवनशैली नेमकी कशी असते? प्रचंड ट्रफिक असलेले रस्ते ओलांडतो कसा? शेकडो किलोमीटर चालत प्रवास करतो कसा? अशी अनेक रहस्ये ‘सावित्री’ ही बिबटय़ाची मादी उलगडणार आहे. मुंबईतील बिबटय़ांचा टेलिमेट्रीद्वारे अभ्यास सुरू झाला आहे. त्यासाठी ‘सावित्री’च्या गळ्यात अद्ययावत कॉलर नुकताच लावला गेला. या कॉलरमधून मिळणाऱया संकेतांद्वारे बिबटय़ांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवता येणार आहे.

दहा वर्षांपूर्वी ‘आजोबा’ नावाचा बिबटय़ा पुण्याच्या माळशेज घाटातून 125 किलोमीटर चालत मुंबईत पोहोचला होता. वन्य जीव संशोधकांनी त्याच्या त्या संपूर्ण प्रवासाचा बारकाईने अभ्यास केला होता. त्यानंतरही बिबटय़ांच्या वर्तणुकीबाबत संशोधकांमधील जिज्ञासा कायम आहे. याच जिज्ञासेतून बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जीपीएस टेलिमेट्रीद्वारे बिबटय़ांवर देखरेख ठेवण्याचा एक प्रकल्प पहिल्यांदाच हाती घेण्यात आला आहे.

वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन सोसायटी आणि वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन ट्रस्टच्या सहकार्याने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पांतर्गत मुंबईतील बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावले जाणार आहेत. त्याची सुरुवात ‘सावित्री’पासून करण्यात आली. थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांमधील अज्ञान दूर करण्यासाठी स्त्राr शिक्षणासारखे महान कार्य केले. त्यांच्या नावावरून मादी बिबटय़ाला ‘सावित्री’ हे नाव देण्यात आले आहे. ही सावित्री आता मुंबईतील बिबटय़ांबाबतचे अज्ञान दूर करून त्यांच्या संवर्धनाचा मार्ग दाखवील असे वनसंरक्षक मल्लिकार्जुन यांनी सांगितले.

प्रकल्पातून या गोष्टींवर प्रकाश पडणार
n बिबटे घोडबंदर रोडसारखे ट्रफिकने गजबजलेले मोठे रस्ते कसे ओलांडतात.
n संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जागा तसेच वेळेचा वापर बिबटे कसे करतात.
n बिबटे मार्गक्रमण कसे करतात.
n बिबटे आणि माणसातील संघर्ष कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल.

पाच बिबटय़ांच्या माध्यमातून होणार अभ्यास

सावित्रीच्या गळ्यातील रेडिओ कॉलर सॅटेलाईटद्वारे संदेश वहन करू शकतो. बिबटे भूप्रदेशाचा वापर कसे करतात याची माहिती मिळवण्यासाठी या यंत्रणेची मदत होणार आहे. हा प्रकल्प दोन वर्षे कालावधीचा आहे. ‘सावित्री’प्रमाणेच आणखी चार बिबटय़ांना रेडिओ कॉलर लावले जाणार आहेत. रेडिओ कॉलरमध्ये सिमकार्ड आहे, जे या बिबटय़ांचे लोकेशन सांगेल. या अभ्यासाद्वारे मिळणारी माहिती प्रसारमाध्यमांना वेळोवेळी दिली जाणार आहे.

– संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आजघडीला सुमारे 45 बिबटे आहेत. वन्य जीव संरक्षक तसेच पशुप्रेमींकडून त्यांचा वेळोवेळी अभ्यास केला जातो. बिबटय़ांच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी उद्यानात ठिकठिकाणी कॅमेरेही लावले गेले आहेत.