
>> दिलीप जोशी
दुसऱया महायुद्धात काही हिंदुस्थानी सैनिक ब्रिटिश फौजेतून जपानविरुद्ध लढले त्यापैकी एक मेजर जनरल डिसूझा. हिरोशिमा शहरात बॉम्ब पडल्यानंतर सात महिन्यांनी त्यांनी अनेक करुण कहाण्या ऐकल्या आणि ते मनाने अण्वस्त्रविरोधी झाले. त्यांच्या ध्वनिमुद्रित मुलाखतीत त्यांनी हिरोशिमा शहर, युद्धाने झालेली हानी आणि याचा परिणाम होत अण्वस्त्र प्रसारबंदीसाठी त्यांनी केलेले कार्य याबद्दल सांगितले आहे.
ऑगस्ट महिना आपल्या देशाच्या अलीकडच्या ऐतिहासिक गोष्टींसाठी जसा महत्त्वाचा तसा जागतिक पातळीवरच्या राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही लक्षात राहणारा. युरोपात 1939 मध्ये दुसरे जागतिक युद्ध भडकलं. प्रचंड जीवित आणि वित्तहानी झाली. काही देश परस्परांचे ‘शत्रू’ झाले, काही ‘मित्र’ झाले. काळाच्या ओघात पुन्हा ‘शत्रूचे मित्र’ आणि ‘मित्राचे शत्रू’ होण्याचा खेळ सुरूच राहिला. आजही हजारो
‘वॉरहेड्स’ जगभर सज्ज आहेतच. इतिहासातली गदा, तलवार या शस्त्रांच्या लढाया मागे सरत आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरापर्यंत पोहोचल्या आहेत. भूमीवरचं युद्ध विमानांनी आकाशात नेलं आणि यापुढे ते कदाचित अवकाशातही पोहोचेल.
या शस्त्रास्त्र उत्क्रांतीमधले एक दाहक हत्यार र्अीहे अॅटमबॉम्ब! या जगात फक्त दोन वेळाच त्याचा वापर एकाच देशाविरुद्ध अवघ्या तीन दिवसांच्या फरकाने झाला आहे. 6 ऑगस्ट 1945 रोजी अमेरिकेने जपानच्या नागासाकी शहरावर भल्या सकाळी मृत्यू भिरभिरू लागला. ‘एनोला गे’ या अमेरिकन हवाई दलाच्या विमानात ‘लिट्ल बॉय’ या गोंडस नावाचा एक भयानक बॉम्ब होता. 20 हजार टन टीएमटीचा हा अणुबॉम्ब या सुमारे पावणेचार लाख लोकसंख्येच्या नगरावर कोसळला आणि सारे शहर अक्षरश: होरपळले. लोखंडी खांब जिथे लोण्यासारखे वितळले तिथे माणसांची, प्राण्यांची, वनस्पतींची काय दुर्दशा झाली असेल कल्पना करा. अमेरिकन अध्यक्ष ट्रूमन यांना यातून झालेल्या नरसंहाराची जाणीव वेळीच झाली नाही ठाऊक नाही, पण 9 ऑगस्टला नागासाकी शहरावर ‘फॅटमॅन’ नावाचा दुसरा अॅटमबॉम्ब टाकण्याचा भीषण निर्णय त्यांनी घेतला. इवल्याशा जपानी बेटाने पुन्हा उत्पात अनुभवला. अध्यक्ष ट्रूमन यांनी मात्र या शतकातील वैज्ञानिक संशोधनाचा टप्पा आम्ही पार केला असं म्हटल्याची प्रतिक्रिया ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने 7 ऑगस्टला प्रसिद्ध केली. पुढच्या काळात ‘हिबाकुशा’ म्हणजे या उत्पाताचे दुष्परिणाम भोगलेल्या व्यक्तींच्या हृदयद्रावक कहाण्या प्रसिद्ध झाल्या. त्यावर चित्रपट निघाले. जगाला या विध्वंसक अस्त्राचा धाक बसला. 1945 नंतर अणुबॉम्बचा वापर पुन्हा झाला नाही.
दुसऱया महायुद्धात अनेक हिंदुस्थानी सैनिक ब्रिटिश फौजेतून जर्मनी, जपान, इटलीच्या विरोधात लढले. त्यापैकी मेजर जनरल डिसूझा यांनीही या युद्धात एक हिंदुस्थानी म्हणून पराक्रम गाजवला होता. त्यांची भेट 1984 मध्ये झाली होती. ती मुलाखत टेपवर ध्वनिमुद्रित केली. मेजर जनरल डिसूझा युद्ध आघाडीवरून बोटीने मायदेशी येत असताना त्यांना जपानवरच्या अणुहल्ल्याचे वृत्त समजले. 1939 पासून ते युरोपात ब्रिटिश सैन्यातून लढत होते. युद्ध संपता संपता अणूबॉम्बची आणि जपानच्या शरणागतीची बातमी समजली तरी ‘या अस्त्राच्या विध्वंसक क्षमतेची आम्हाला तेव्हा कल्पनाच नव्हती’ असं त्यांनी सांगितलं. ते मुंबईत परतल्यावर दोन महिन्यांची सुट्टी संपताच त्यांची नेमणूक जपानचा ताबा घेणाऱया तुकडीत झाली. तो अनुभव मात्र हृदयद्रावक होता. मेजर जनरल सांगत होते ‘1946 च्या मार्च महिन्यात आम्ही जपानच्या ‘हीरो’ बंदरात पोहोचलो. तिथून हिरोशिमा 32 किलोमीटरवर होते.
अॅटमबॉम्ब पडून विनाश झालेल्या त्या शहरात पोहोचलो तेव्हा युद्धाने झालेली हानी दिसू लागली, पण माझ्या सैनिकी मनाला त्याची सवय होती. मात्र तिथल्या एका कोसळलेल्या मनोऱयावर उभं राहून शहर न्याहाळले तेव्हा भीषण उत्पाताची कल्पना आली. त्या शहरात बॉम्ब पडल्यानंतर सात महिन्यांनी ज्या करुण कहाण्या ऐकल्या आणि मनाने अण्वस्त्राविरोधी झालो. पीडित जगण्यासाठी जिद्दीने धडपडत होते तरी मदतीसाठी हात पसरत नव्हते हे विशेष.
पुढच्या काळात अण्वस्त्र प्रसारबंदीसाठी मे. ज. डिसूझा यांनी सातत्याने कार्य केलं. जपानमध्ये त्यांना सामान्य जपानी नागरिकांशी बोलण्याची परवानगी नव्हती, पण हिंदुस्थानात स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले आणि आम्ही जपान्यांशी मुक्तपणे बोलू लागलो, असं त्यांनी सांगितलं. आता या घटनेला 78 वर्षांहून अधिक काळ उलटला. युद्धात उतरलेले जपानी सम्राटही काही कमी युद्धखोर नव्हते. तेही
अॅटमबॉम्ब बनवण्याचा विचार करीतच होते असं नंतर वाचनात आलं. दुसरं महायुद्ध संपलं. जपान राखेतून फिनिक्स पक्ष्यासारखा भरारी घेऊन उठला. आज हिरोशिमा, नागासाकी ही सुंदर शहरे आहेत. मात्र अणुबॉम्बच्या उत्पाताची जाणीव करून देणारं स्मारकही तिथे आहे. ज्या पहिल्या हिंदुस्थानी सैनिकांनी तो पाहिला त्यांनीही या अण्वस्त्राविरोधात मानवतेची भूमिका घेतली.





























































