कोण ठरणार ‘सवाई’तील ‘सवाई’! 34 वर्षांतील विजेत्या एकांकिकांमध्ये रंगणार चुरशीची स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकांकिका क्षेत्रात चतुरंग प्रतिष्ठानची ‘सवाई एकांकिका स्पर्धा’ ही सर्वाधिक प्रतिष्ठेची मानली जाते. दरवर्षी जानेवारी ते डिसेंबरमध्ये राज्यस्तरीय पातळीवर होणाऱ्या स्पर्धांतून केवळ प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांमध्ये सवाई एकांकिका स्पर्धा होते आणि दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रात्रभर जल्लोषात साकार होत असते. कोरोनामुळे या वर्षभरात राज्यात कुठेच एकांकिका स्पर्धा झाल्या नाहीत, परंतु तमाम रंगकर्मींच्या मनातील या स्पर्धेविषयीच्या भावनांची जाणीव ठेवून चतुरंग प्रतिष्ठान यंदा वेगळ्याच पद्धतीने स्पर्धा योजण्याचा विचारात आहे. 1987 ते 2020 पर्यंत या स्पर्धेचे आयोजन अव्याहतपणे होत राहिलेले आहे. या वर्षी गेल्या 34 वर्षांतील सवाई प्रथम पारितोषिकाचा मान मिळविणाऱ्या सर्व संस्थांची आणि एकांकिकांचीच सवाई स्पर्धा घेण्याचा विचार असून यातून निवडली जाणारी सर्वोत्कृष्ट एकांकिका ही यंदा ‘सवाई’तील ‘सवाई’ ठरणार आहे.

विजेत्यांना ‘चतुरंग’चे आवाहन       

सर्व विजेत्या स्पर्धक संस्थांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन जानेवारी 2022चे सवाई स्पर्धा आयोजन सुनिश्चित करण्यात येणार आहे. गरजेनुसार अंतिम स्पर्धेचा दिवसही कदाचित किंचित काळा वाढवला जाईल. चतुरंग प्रतिष्ठानकडून जुन्या सवाई विजेत्या सर्व स्पर्धक संस्थांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांना या वर्षीच्या या नवस्वरूपी सवाई स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा असल्यास 10 डिसेंबर 2021 पर्यंत आपला होकार मेघना काळे यांच्याकडे अथवा चतुरंग संस्थेच्या [email protected] या ई-मेलवर कळवावा.

आजवरच्या 34 वर्षांत ‘सवाई प्रथम’चा सन्मान मिळविलेल्या सर्व संस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न चतुरंग प्रतिष्ठानतर्फे केला जात असून त्या त्या स्पर्धक संस्थांनी ‘सवाईपद प्राप्त केलेली एकांकिकाच’ यंदाच्या स्पर्धेत सादर करणे अपेक्षित आहे. अर्थात स्पर्धा सुरू झाल्याला 1987 सालापासूनचा आजवरचा लोटलेला दीर्घ कालावधी लक्षात घेता त्याच कलाकार संचात एकांकिका सादर करणे काही संस्थांना अशक्य ठरू शकते. त्यामुळे त्याच विजेत्या एकांकिकेचे सादरीकरण अन्य कोणत्याही सोयीच्या कलाकारांना घेऊन करणे या वर्षीच्या स्पर्धेपुरते चतुरंग प्रतिष्ठानला मान्य असणार आहे. हीच बाब तांत्रिक गोष्टींसाठी सहभागी असणाऱ्यांनाही लागू केली जाईल. एकांकिकेबाबत मात्र सवाई प्रथम ठरलेली एकांकिकाच सादर करावी लागेल हा ठळक नियम राहील.

 स्पर्धक संस्थांचा प्रतिसाद लक्षात घेऊन या स्पर्धा आयोजनाचे नव्याने निश्चित केलेले नियम-निकष व अन्य सर्व तपशील उत्सुक स्पर्धकांना फोन संपर्काद्वारे किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येतील.अंतिम फेरीचे आयोजन तत्कालीन बाह्य परिस्थिती लक्षात घेऊन ऑनलाइन अथवा ऑफलाइन पद्धतीने करण्याचा मुद्दादेखील विचाराधीन राहील. सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या संस्थांची या दोन्ही पद्धतीने सादरीकरणाची तयारी असावी, असेही आयोजकांनी कळविले आहे.